esakal | पहिल्या दिवसअखेरीस भारत-कॅनडा बरोबरी
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या दिवसअखेरीस भारत-कॅनडा बरोबरी

भारतीय खेळाडूंनी जोरदार खेळ केला. रामने प्रतिकूल परिस्थितीतून विजय मिळविला. युकीनेदेखील जवळपास विजय मिळविला होता. पण, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. भारतीयांनी असाच खेळ कायम ठेवला, तर कॅनडावर निश्‍चित दडपण राहील.
- महेश भूपती, भारतीय संघाचे कर्णधार

पहिल्या दिवसअखेरीस भारत-कॅनडा बरोबरी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

एडमाँटन (कॅनडा) - जागतिक गटात प्रवेश करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या डेव्हिस करंडक लढतीत पहिल्या दिवशी एकेरीच्या लढतीनंतर भारत आणि कॅनडा यांच्यात १-१ अशी बरोबरी राहिली. सलामीच्या लढतीत रामकुमार रामनाथन याने विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या एकेरीच्या लढतीत युकी भांब्रीचे प्रयत्न अपुरे पडले. आता उद्या होणारी दुहेरीची लढत निर्णायक ठरेल.

युकीचा प्रभाव
युकीला पराभव पत्करावा लागला असला, तरी त्याने एकवेळ वेगवान खेळ करणाऱ्या शापोवालोवच्या छातीत धडकी निश्‍चित भरवली होती. डावखुऱ्या शापोवालोव याने सुरवातीपासून आपल्या वेगवान आणि ताकदवान खेळाचे प्रदर्शन केले होते. तुलनेत युकीचा खेळ सुरवातीपासून बचावात्मक राहिला होता. तिसरा सेट जिंकल्यावर मात्र त्याचा आत्मविश्‍वास जबरदस्त उंचावला होता. चौथा सेटही त्याने जिंकून कॅनडाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. मात्र, निर्णायक सेटमध्ये सुरवातीलाच युकीला सर्व्हिस राखण्यात अपयश आले आणि तेथेच लढतीचा निर्णय स्पष्ट झाला. शापोवालोवने तिसऱ्या आणि सहाव्या गेमला सर्व्हिस ब्रेकची संधी साधून ५-१ अशी आघाडी मिळविली आणि जोरकस फोरहॅंडच्या फटक्‍यावर त्याने विजय मिळविला. तेव्हा कॅनडाने सुटकेचा निःश्‍वास टाकला.

रॅफेल नदाल, ज्यो विल्फ्रेड त्सोंगा आणि ज्युआन मार्टिन डेल पोट्रो या मातब्बरांवर विजय मिळविणारा शापोवलोव कारकिर्दीत प्रथमच पाच सेटची लढत खेळला. प्रत्येक विजय सोपा नसतो याची जाणीव मला युकीने करून दिली ही त्याची प्रतिक्रिया निश्‍चितच बोलकी होती. 

अपराजित रामकुमार
डेव्हिस करंडक लढतीत आतापर्यंतच्या पाचही लढती जिंकून रामकुमारने अपराजित्व कायम राखले. पण, या वेळी त्याला श्‍नुरविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला हे विसरता येणार नाही. 

रामकुमारने लढतीत प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी आपला खेळ उंचावला. मग ती सर्व्हिस असो किंवा रॅली. त्याने सर्वस्व पणाला लावले. त्याने १८ पैकी १५ ब्रेक पॉइंट वाचवले. प्रदीर्घ लढत (तीन तास १६ मिनिटे) खेळताना त्याने दाखवलेली शारीरिक तंदुरुस्तीच खऱ्या अर्थाने विजयात निर्णायक ठरली.

निकाल - भारत १ कॅनडा १
रामकुमार रामनाथन वि.वि. ब्रायडेन श्‍नुर 
५-७, ७-६(७-४), ७-५, ७-५
युकी भांब्री पराभूत वि. डेनिस शापोवालोव 
६-७(२-७), ४-६, ७-६(८-६), ६-४, ६-१