
बेनॉईट काही चांगले फटके मारत होता. दुसरीकडे कढेचीची फर्स्ट सर्व्ह अत्यंत भक्कम झाली. पहिल्या नऊ-दहा सर्व्हिस आत आल्या. हे निव्वळ अविश्वसनीय वाटले. त्याने प्रारंभी एकही शॉट चुकविला नाही. तो अनुभवात कमी असल्यामुळे त्याला टार्गेट करण्याचे आमचे डावपेच नव्हते. तसे होऊ शकत नाही. त्याचा खेळ चांगला वाटला.
- रॉबीन हासी, नेदरलॅंड्सचा टेनिसपटू
पुणे - पुण्याच्या अर्जुन कढेने फ्रेंच जोडीदार बेनॉईट पैरे याच्या साथीत टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत प्रयत्नांची शिकस्त केली; पण द्वितीय मानांकित नेदरलॅंड्सच्या मॅटवे मिडीलकूप-रॉबीन हासी यांनी अनुभव पणास लावत १-६, ७-५, १०-७ असा विजय खेचून आणला. सलामीच्या दिवशी रामकुमार रामनाथन याने वाईल्ड कार्डच्या संधीचे चीज करीत विजयी सलामी देत रंग भरले.
म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या कोर्टवर मुख्य स्पर्धा आजपासून सुरू झाली. पहिला सेट लिलया जिंकल्यानंतर बेनॉईट आपला अनुभव पणास लावत नॉक-आउट पंच मारण्याची अपेक्षा होती; पण सुरवातीला त्याचे काही फटके चुकले. त्यात त्याने रॅकेट कोर्टवर आपटली, परिणामी त्यावरील प्लॅस्टिकचे कव्हर निघाले. ते हाताने काढण्याच्या प्रयत्नात बेनॉईटला लागले, त्यामुळे रक्त आले. यानंतर त्याची एकाग्रता आणखी ढळली. त्याने गुण गमावल्यावर चेंडू बाहेर मारण्याचा प्रकार दोन वेळा केला.
दुसरीकडे अर्जुन तुलनेने कमी अनुभव असूनही भक्कम खेळ करीत होता. बेसलाइनवरून, तसेच नेटजवळही त्याने परिपक्वता व चपळाई प्रदर्शित करीत पुणेकर टेनिसप्रेमींच्या टाळ्या मिळविल्या. विशेष म्हणजे तो बेनॉईटला प्रोत्साहन देत होता. अमेरिकेत कॉलेज टेनिसमध्ये दुहेरीत खेळण्याचा अनुभव त्याने पणास लावला. बेनॉईटने मात्र एकेरीच्या जोडीला दुहेरीतही मिळालेल्या वाईल्ड कार्डची संधी वाया घालविली. त्याची हुरहूर सर्वांना लागली.
स्थानिक सहभाग असलेला सामना प्रकाशझोतात खेळविण्यात आला. त्यामुळे टेनिसप्रेमींची गर्दी चांगली होती. पहिल्या सेटमध्ये अर्जुन- बेनॉईटने चौथ्या गेममध्ये मिडीलकूप, तर सहाव्या गेममध्ये रॉबिनची सर्व्हिस भेदली, त्यामुळे पहिला सेट एकाच गेमच्या मोबदल्यात जिंकत अर्जुन- बेनॉईटने आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्ये अटीतटीचा खेळ झाला. त्यात १०व्या गेममध्ये दडपण असूनही अर्जुनने सर्व्हिस राखली. १२व्या गेममध्ये मात्र बेनॉईटने सर्व्हिस गमावली. नेदरलॅंड्सच्या जोडीने याबरोबरच बरोबरी साधली.
मॅच टायब्रेकमध्ये बेनॉईटची एकाग्रता ढळली. त्याचा फटका नेटमध्ये गेल्याने अर्जुनच्या सर्व्हिसवरील गुण गेला. पिछाडी कमी केल्यानंतरही बेनॉईटला एकाग्रता साधता आली नाही.
रामकुमारने रंग भरले
रामकुमारने रॉबर्टो कार्बालेस बाएना याला ७-६ (७-४), ६-२ असे हरवून विजयी सलामी दिली. जागतिक क्रमवारीत राम १४८, तर रॉबर्टो १०६व्या क्रमांकावर आहे. रामने आक्रमक पण नियंत्रित खेळ केला. त्याने शेवटपर्यंत पकड निसटू दिली नाही.
धक्कादायक निकाल
पुरुष एकेरीत पहिला धक्कादायक निकाल नोंदविण्याचा पराक्रम स्पेनच्या रिकार्डो ओजेडा लारा याने केला. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या रिकार्डोने सहाव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या यिरी वेसेलीचे आव्हान ६-३, ७-६ (७-५) असे परतावून लावले. रिकार्डो १९८व्या क्रमांकावर आहे.
सातवा मानांकित कझाकिस्तानचा मिखाईल कुकुश्कीन आणि आठवा मानांकित फ्रान्सचा पिएर-ह्युजेस हर्बर्ट यांनी आगेकूच केली. हर्बर्टने इटलीच्या मार्को सेच्चीनाटोला ७-६ (७-४), ६-७ (८-६), ६-२ असे हरविले, तर कुकुश्कीनने मोल्डोवाच्या राडू अल्बॉटला ६-२, ७-६ (७-४) असे हरविले.
बालाजी- विष्णूची संधी हुकली
दुहेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या एन. श्रीराम बालाजी-विष्णू वर्धन यांना दुहेरीत चुरशीचा सामना गमवावा लागला. आदिल शमास्दीन (कॅनडा)- नील स्कुप्स्की (ब्रिटन) या जोडीने त्यांना ६-३, ७-६ (१०-८), १०-६ असे हरविले.