esakal | युकी-दिवीजची दुहेरीत सनसनाटी
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाळुंगे बालेवाडी - टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत गुरुवारी पिएर हर्बर्टविरुद्ध परतीचा फटका मारताना मरिन चिलीच.

युकी-दिवीजची दुहेरीत सनसनाटी

sakal_logo
By
मुकुंद पोतदार

पुणे - युकी भांब्रीने टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेच्या एकेरीतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर दुहेरीत दिवीज शरणच्या साथीत सनसनाटी निकाल नोंदविला. ऐनवेळी एकत्र आलेल्या जोडीने अग्रमानांकित रॉबर्ट लिंडसेट (स्वीडन)-फ्रॅंको स्कुगॉर (क्रोएशिया) यांना हरवून उपांत्य फेरीत धडक मारली. गतविजेता रोहन बोपण्णा आणि जीवन नेदूंचेझीयन यांची जोडी मात्र पराभूत झाली.

दुहेरीत युकीचा क्रमांक ३७६वा आहे. तो दुहेरीत क्वचित खेळतो. त्यानंतरही त्यांनी स्थिरावलेल्या जोडीला मॅच-टायब्रेकमध्ये हताश केले. त्यामुळे भारताच्या आशा कायम राहिल्या. सेंटर कोर्टवर बोपण्णा-जीवन यांचा जिल्स सिमॉन आणि पिएर-ह्युजेस हर्बर्ट यांच्याकडून पराभव झाला. 

दरम्यान, एकेरीत अग्रमानांकित क्रोएशियाच्या मरिन चिलीचने उपांत्य फेरीत प्रवेश केला. हॉट फेव्हरीट चिलीचने फ्रान्सच्या पिएर-ह्युजेस हर्बर्टला दोन सेटमध्ये हरविताना दमदार फॉर्म प्रदर्शित केला. द्वितीय मानांकित केव्हिन अँडरसन याच्यासह सरस मानांकित स्पर्धकांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळविल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत अनपेक्षित निकाल लागले नाहीत.

चिलीचने एक तास चार मिनिटांत सामना जिंकला. ग्रॅंड स्लॅम विजेता टेनिसपटू कोर्टवर किती भक्कम खेळ करतो आणि हुकुमत राखतो याचा आदर्श वस्तुपाठ चिलीचने सादर केला. 

निकाल (उपांत्यपूर्व फेरी)
दुहेरी - युकी भांब्री-दिवीज शरण विवि रॉबर्ट लिंडसेट (स्वीडन)- फ्रॅंको स्कुगॉर (क्रोएशिया) ७-५, २-६, १०-६. जिल्स सिमॉन-पिएर-ह्युजेस हर्बर्ट (फ्रान्स) विवि रोहन बोपण्णा-जीवन नेदूंचेझीयन ६-३, ७-५.

एकेरी - मरिन चिलीच (क्रोएशिया १) विवि पिएर-ह्युजेस हर्बर्ट (फ्रान्स ८) ६-३, ६-२. जिल्स सिमॉन (फ्रान्स) विवि रिकार्डो ओजेडा लारा (स्पेन) ६-२, ६-३. बेनॉईट पैरे (फ्रान्स ४) विवि रॉबिन हासी (नेदरलॅंड्‌स ५) ७-५, २-६, ६-३. केव्हिन अँडरसन (दक्षिण आफ्रिका २) विवि मिखाईल कुकुश्‍कीन (कझाकस्तान ७) ६-७ (३-७), ६-४, ६-२.