esakal | बिगर मानांकित सिमॉनची बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

दुहेरीत विजेतेपद मिळविणारी जोडी रॉबिन हासी-मॅटवे मिडीलकुप

बिगर मानांकित सिमॉनची बाजी

sakal_logo
By
मुकुंद पोतदार

पुणे - बिगर मानांकित फ्रान्सच्या जिल्स सिमॉनने पहिल्या टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेतील सनसनाटी निकालांची मालिका कायम राखत विजेतेपद पटकावले. द्वितीय मानांकित केव्हीन अँडरसनला दोन सेटमध्येच हरवित त्याने हा पराक्रम केला. अथक प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांना त्याने जल्लोषाची पर्वणी दिली.

सिमॉनने आधीच्या तीन लढतींत एकदाही अँडरसनला हरविले नव्हते. यावेळी त्याने पहिलावहिला विजय संपादन केला. अँडरसनची सुरवात चांगली झाली, पण सिमॉनने बेसलाइनवरून भक्कम खेळ केला. त्याचे फोरहॅंड रिटर्न भेदक होते. त्याचा फॉर्म आणि देहबोली सरस आणि सफाईदार वाटत होती. सामन्यातील पहिला सर्व्हिस ब्रेक त्याने मिळविला. त्यानंतर दहाव्या गेमला अँडरसनने ब्रेकची भरपाई केली.

त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. त्यात दुसऱ्याच गुणाला मिनी ब्रेक मिळविताना अँडरसनने फोरहॅंडचा अप्रतिम फटका मारला, पण पुढच्याच गुणाला त्याचा फटका नेटमध्ये गेला. नंतर सिमॉनचा पासिंग शॉट बाहेर गेला. पाचवा गुण अँडरसनने गमावला. मग सिमॉनने बाजी मारली. भक्कम सर्व्हिस आणि रिटर्न शॉटमुळे तो सरस ठरला, तर बिनतोड सर्व्हिस करूनही अँडरसनला फायदा झाला नाही. टायब्रेकमधील अखेरच्या गुणाला तब्बल ३३ शॉटची रॅली झाली. त्यात सिमॉनने पासिंग शॉट मारत अँडरसनला 
निरुत्तर केले.

दुसऱ्या सेटमध्ये सिमॉनने सहाव्याच गेममध्ये ब्रेक मिळवत पकड भक्कम केली. त्यामुळे त्याचा विजय एकतर्फीच ठरला.

निकाल (अंतिम) 
जिल्स सिमॉन (फ्रान्स) विवि केव्हीन अँडरसन (दक्षिण आफ्रिका २) ७-६ (७-४), ६-२

सिमॉनचा दुहेरी मुकुट हुकला
दुहेरीच्या अंतिम सामन्यात सिमॉनचा देशबांधव पिएर-ह्युजेस हर्बर्ट याच्या साथीत पराभव झाला. द्वितीय मानांकित नेदरलॅंड्‌सच्या रॉबिन हासी-मॅटवे मिडीलकुप यांनी ७-६ (७-५), ७-६ (७-५) अशा विजयासह जेतेपद पटकावले. या पराभवामुळे सिमॉनची दुहेरी मुकुटाची संधी हुकली.