अव्वल मानांकित मरेदेखील गारद

वृत्तसंस्था
Monday, 23 January 2017


या लढतीत मी स्वतःला गृहित धरले नव्हते. लढत सुरू झाल्यावर केवळ सर्व्हिस आणि व्हॉलीवर नियंत्रण ठेवले. एका क्षणी मिळविलेले काही गुण असे होते की ते मला कसे मिळाले, हेच कळाले नाही. या विजयाने कमालीचा प्रेरित झालो आहे.
- मिशा झ्वेरेव

मेलबर्न : कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे पहिले विजेतेपद मिळविण्याचे ब्रिटनच्या अँडी मरेचे स्वप्न रविवारी भंग पावले. चौथ्या फेरीत जर्मनीच्या मिशा झ्वेरेव याने अव्वल मानांकित मरेचा 7-5, 5-7, 6-2, 6-4 असा पराभव केला. त्याची गाठ आता रॉजर फेडररशी पडणार आहे.

दुखापतीमुळे कारकिर्दीवर परिणाम झालेल्या झ्वेरेव याने कारकिर्दीत प्रथमच ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेची आगेकूच बाद फेरीपर्यंत कायम राखली. प्रतिस्पर्ध्याला बुचकळ्यात टाकणारी सर्व्हिस करण्याची आणि व्हॉली मारण्याच्या शैलीने झ्वेरेव याने साडेतीन तासांच्या खेळानंतर विजय मिळविला.
गतविजेता नोव्हाक जोकोविच बाद झाल्यामुले मरे याचा विजेतेपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. मात्र, आज त्या अंदाजाला धक्का बसला. झ्वेरेवकडी फटक्‍यांच्या विविधतेमुळे एकवेळ मरेदेखील प्रभावित झाला होता. त्याने अफलातून फटके मारले. त्याचबरोबर त्याच्या वेगवान फटक्‍यांसाठी माझ्याकडे उत्तर नव्हते, असे मरे याने सांगितले.

झ्वेरेव याने आज संपूर्ण लढतीत 119 वेळा नेटवर येऊन खेळताना मरेवर दडपण आणले होते. पहिल्या दोन सेटमध्ये त्याने पाच वेळा मरेची सर्व्हिस भेदली. जर्मनीच्या 29वर्षीय झ्वेरेव याने पहिली बिनतोड सर्व्हिस करताना पहिला सेट जिंकला. त्यानंतर मरेला दुसरा सेट जिंकताना आपली आक्रमकता आणि अनुभव पणाला लावावा लागला. तिसऱ्या सेटमध्ये झ्वेरेवने 3-2 आणि 5-2 अशा आघाडीनंतर आपल्या जोरकस सर्व्हिसने तिसरा सेट जिंकला. चौथ्या सेटमध्ये सुरवातीलाच तब्बल आठ ब्रेकपॉइंट वाचवून मरेने पहिली गेम जिंकली होती. मरेला हा धोक्‍याचा इशारा होता; पण त्यानंतरही मरेला विजयाचा मार्ग सापडलाच नाही. झ्वेरेवदेखील निर्णायक क्षणात निराशेच्या गर्तेत अडकला होता; पण मरेचा एक फटका बाहेर गेला आणि त्याच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
 

वाव्रींका, फेडररची आगेकूच
पुरुष एकेरीत स्टॅन वाव्रींका यानेदेखील विजयी आगेकूच कायम राखली. त्याने इटलीच्या आंद्रेआस सेप्पी याचा 7-6(7-2), 7-6(7-4), 7-6(7-4) असा पराभव केला. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान 6-7 (4-7), 6-4, 6-1, 4-6, 6-3; तर फ्रान्सच्या ज्यो विल्फ्रेड त्सोंगाने ब्रिटनच्या डॅनिएल इव्हान्स याचा 6-7(4-7), 6-2, 6-4, 6-4 असा पराभव केला.
महिला एकेरीत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्स हिने जर्मनीच्या मोना बार्थेल हिचे आव्हान 6-3, 7-5 असे संपुष्टात आणले. तिची गाठ आता रशियाच्या ऍनास्तासिया पावल्युचेन्कोवा हिच्याशी पडेल. गाब्रिन मुगुरुझा हिने रुमानियाच्या सोराना किर्स्टेआ हिचा 6-2, 6-3 असा सहजपराभव केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top ranked murray beaten