पेसने चिडण्याचे कारणच काय - भूपती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 April 2017

संघातील स्थान निश्‍चित नसल्याची कल्पना देण्यात आली होती
बंगळूर - डेव्हिस करंडक लढतीसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर लिअँडर पेसने चिडचिड करण्याची काहीच गरज नव्हती. "तुझे संघातील स्थान निश्‍चित नाही,' याची कल्पना त्याला आधी देण्यात आली होती, असे भारतीय डेव्हिस करंडक संघाचा कर्णधार महेश भूपती याने सांगितले.

संघातील स्थान निश्‍चित नसल्याची कल्पना देण्यात आली होती
बंगळूर - डेव्हिस करंडक लढतीसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर लिअँडर पेसने चिडचिड करण्याची काहीच गरज नव्हती. "तुझे संघातील स्थान निश्‍चित नाही,' याची कल्पना त्याला आधी देण्यात आली होती, असे भारतीय डेव्हिस करंडक संघाचा कर्णधार महेश भूपती याने सांगितले.

उझबेकिस्तान विरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी महेश भूपतीने पेसच्या ऐवजी रोहन बोपण्णाला पसंती दिली होती. त्यानंतर पेसने त्रागा केला होता. निवडीला निकष वगैरे काहीच न लावता महेशने आपल्याबरोबरच्या वैयक्तिक मतभेदामुळेच आपल्याला वगळल्याची टीका केली होती.

महेशने लढत होईपर्यंत या टीकेला उत्तर दिले नव्हते. पेसशिवाय दुहेरीची लढत जिंकून भारताने विजय मिळविला. त्यानंतर महेश म्हणाला, 'पेसने देशासाठी जे काही मिळविले, त्याबद्दल प्रत्येकाला त्याच्याबद्दल आदर आहे. आम्ही सहा जणांत त्याला स्थान दिले होते; पण अंतिम चार जणांच्या संघातून वगळण्यात आल्यावर त्याने टीका करायला सुरवात केली. संघातील स्थान कुणीच ग्राह्य धरू नये, असे सर्वांना सांगण्यात आले होते.''

एकेरी काय किंवा दुहेरी काय, दोन्ही प्रकारात खेळण्याची सवय असायला हवी, या मुद्यावर महेश विजयानंतरही ठाम होता. तो म्हणाला, 'दुहेरीची लढत केवळ दुहेरीच खेळणाऱ्या खेळाडूने खेळायला हवी. एकेरीतील खेळाडू दुहेरीत खेळू शकत नाही, असे होत नाही. माझ्या नियोजनानुसार संघात दुहेरीसाठी केवळ एकच जागा होती आणि त्यासाठी बोपण्णाशिवाय मला दुसरा योग्य पर्याय वाटला नाही. सध्या तरी भारतात बोपण्णाच दुहेरीतील अव्वल खेळाडू आहे.''

पेसला तंदुरुस्ती चाचणी देण्यास सांगितल्यानंतरही त्याने त्यास नकार दिला याकडेही महेशने लक्ष वेधले. तो म्हणाला, 'संघ एकावरच अवलंबून नसतो. संघात चार खेळाडू असतात. प्रत्येकाला नियम सारखे असतात. ते त्याने पाळायचे असतात. सरावालादेखील उपस्थित राहायचे असते. एकत्र नसाल, तर खेळाडूंमध्ये समन्वय कसा राहील.''

सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपस्थित असलेल्या रोहननेदेखील अखेरच्या क्षणापर्यंत आपण संघात असू, याची कल्पना मलादेखील नव्हती, असे सांगून बोपण्णा म्हणाला, 'मला आणि पेसला महेशने बुधवारशिवाय आपण संघ निवडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आदल्या दिवसापर्यंत मी निवडला जाईन, असे मलादेखील वाटत नव्हते. मी संघाबरोबर सराव करण्यासाठी आणि तंदुरुस्ती चाचणीसाठी वेळेत दाखल झालो होतो. आम्ही विजय मिळविला याचा आम्हाला आनंद आहे.''

डेव्हिस करंडक संघाचा एक भाग राहिलो याचा मला अभिमान आहे. संघात दोन खेळाडू पदार्पण करत असताना, अनुभवी खेळाडू म्हणून मला त्यांच्या बरोबरीने उभे राहायचे होते. त्यांच्याबरोबर उभे राहून कोर्टवर उतरायचे होते. तेच मी येथे केले.
-रोहन बोपण्णा, भारताचा टेनिसपटू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what reason paes fester