esakal | क्विटोवा, शारापोवाची "एक्‍झिट' 
sakal

बोलून बातमी शोधा

Wimbledon Tennis Championship

संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या पेट्रा क्विटोवा आणि माजी विजेत्या मारिया शारापोवा यांना यंदाच्या विबंल्डन टेनिस स्पर्धेतून पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. 

क्विटोवा, शारापोवाची "एक्‍झिट' 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन - संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या पेट्रा क्विटोवा आणि माजी विजेत्या मारिया शारापोवा यांना यंदाच्या विबंल्डन टेनिस स्पर्धेतून पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. 

दोन वेळच्या विजेत्या क्विटोवा हिला बेलारूसच्या ऍलेक्‍झांड्रा सॅस्नोविच हिने 6-4, 4-6, 6-0 असे पराभूत केले. चेक प्रजासत्ताकच्या क्विटोवा हिचा यंदाच्या मोसमातील धडाका जबरदस्त होता. संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत तिला गणले जात होते. मात्र, तिला लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही. 2016 मध्ये झालेल्या चाकू हल्ल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या क्विटोवाला सहा मोठ्या स्पर्धांपैकी पाच स्पर्धांतून उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच पराभव पत्करावा लागला आहे. या अपयशाला विंबल्डन स्पर्धाही अपवाद ठरली नाही. 

क्विटोवाप्रमाणे माजी विजेत्या शारापोवालाही पहिली फेरी मानवली नाही. रशियाच्याच विटालिया डियाट्‌चेन्को हिने तिचे आव्हान 6-7 (3-7), 7-6 (7-3), 6-4 असे संपुष्टात आणले. सत्तावीस वर्षीय डियाट्‌चेन्को हिला पहिल्या सेटमध्ये 3-3 अशा बरोबरीत मेडिकल टाइम आउट घ्यावा लागला होता. त्यानंतरही तिने जिगरबाज खेळ करत बाजी मारली. तिसऱ्या सेटमध्येही तिला एकदा ट्रेनरला बोलवावे लागले होते. शारापोवाने दोन वेळा तिची सर्व्हिस भेदली होती. मात्र, प्रत्येकवेळी डियाट्‌चेन्को हिने तिला प्रत्युत्तर देत अनपेक्षित विजय मिळविला. शारापोवाकडून झालेल्या डबल फॉल्टवर तिने तीन तासांच्या लढतीत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

जोकोविच, नदालचा विजय 
सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच आणि स्पेनच्या रॅफेल नदाल यांनीही विजयी सुरवात केली. जोकोविचने अमेरिकेच्या टेनिस सॅंडग्रेनचा 6-3, 6-1, 6-2 असा पराभव केला. रॅफेल नदालने इस्राईलच्या डुडी सेला याचा 6-3, 6-3, 6-2 असा पराभव केला.