खेळाडूंच्या बक्षिसांवर  खो-खो असोसिएशनचा `डल्ला` 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

मुंबई : राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल राज्य शासनाने खेळाडूंसाठी जाहीर केलेल्या रोख पारितोषिकातील एक लाख रुपये महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला देणगी स्वरूपात द्यावेत. ही रक्कम थेट खात्यावर जमा करावी, असे आदेश असोसिएशनने दिले आहेत. 

मुंबई : राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल राज्य शासनाने खेळाडूंसाठी जाहीर केलेल्या रोख पारितोषिकातील एक लाख रुपये महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला देणगी स्वरूपात द्यावेत. ही रक्कम थेट खात्यावर जमा करावी, असे आदेश असोसिएशनने दिले आहेत. 
खेळाडूंचा सराव, प्रशिक्षण, साहित्य, विकास यावर खर्च करण्याऐवजी उलट त्यांच्या बक्षिसाच्या पैशांवर डल्ला मारण्याचा हा प्रकार आहे. विशेष म्हणजे, ही सर्व माहिती बक्षीसप्राप्त खेळाडूंच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवारच नव्हे, तर खुद्द बक्षीस देणारे शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनाही याबाबत माहिती नाही.

कॉंग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात श्री. पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणारे खेळाडू, संघांसाठी पारितोषिक सुरू केले. त्याचा खेळाडूंना फायदाही होऊ लागला. पण या रकमेवर संघटनांचा डोळा होता. याला खो-खो असोसिएशनही अपवाद नाही. विजयी संघाला पाच लाख, उपविजेत्या संघास तीन लाख, तर तृतीय (कांस्यपदक) संघास दोन लाख रुपये देण्याचे ठरले. 2011 मध्ये रांची (झारखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत खो-खोमध्ये मुलांचा संघ विजयी, तर मुलींचा संघ उपविजेता ठरला. या दोन्ही संघांतील खेळाडूंना प्रत्येकी पाच लाख (एकूण 12 खेळाडूंचे 60 लाख), तर मुलींच्या संघास प्रत्येकी तीन लाख याप्रमाणे 36 लाख रुपये मिळाले. त्यानंतर असोसिएशनने त्यातील 10 टक्के म्हणजे एकूण नऊ लाख 60 रुपये महाराष्ट्र संघाकडे जमा करण्याचा फतवा काढला. ही रक्कम जमाही झाली. 

वाढता वाढता वाढे अपेक्षा 

नियमित होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्र, विदर्भ, कोल्हापूरचे संघ सहभागी होतात. राष्ट्रीय स्पर्धेत मात्र या तिन्ही संघांचा मिळून महाराष्ट्र संघ सहभागी होतो. इतर राष्ट्रीय स्पर्धांसाठी मात्र गतवेळच्या पात्रता फेरीतील विजेत्या आठही संघांना थेट प्रवेश मिळतो. 2014 ला केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही संघांना मिळून एक कोटी 20 लाख रुपये मिळाले. एवढी बक्कळ रक्कम पाहून असोसिएशनच्या तोंडाला पाणी सुटले आणि या वेळी दहा टक्‍क्‍यांऐवजी 20 टक्के रक्कम जमा करण्याचा आदेश निघाला. त्यामुळे असोसिएशनला 24 लाख रुपये मिळाले. याच धर्तीवर साउथ एशियन आणि एशियन चॅंपियन स्पर्धेतही असोसिएशनला पैसे मिळाले. ही रक्कम आता अंदाजे 50 लाखांच्या घरात गेली असून, ती मुदतठेव म्हणून ठेवण्यात आली आहे. 

ग्रुपद्वारे पोचवला संदेश 

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विजेत्या संघातील खेळाडूंचा व्हॉट्‌सऍपवर ग्रुप तयार केला. त्याद्वारे संदेश पाठवून ही रक्कम असोसिएशनला देणगी म्हणून द्यायची असल्याचे व ती असोसिएशनच्या नावे धनादेशाद्वारे थेट खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले. खात्यावर पैसे जमा झाले नसतील, तरी असोसिएशनच्या नावे धनादेश तुषार सुर्वे यांच्याकडे जमा करावा. खात्री करूनच तो बॅंकेत टाकला जाईल, असा चंद्रजीत सरांचा निरोप असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. 

"दादा' या भोंगळ कारभाराला घाला आळा 

श्री. अजित पवार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनीच या प्रकाराकडे लक्ष देऊन भोंगळ कारभाराला आळा घालावा, अशी मागणी विविध जिल्ह्यांतील खेळाडू, प्रशिक्षक व संघटकांकडून होऊ लागली आहे. 
 

Web Title: marathi news kho kho assocition player fund