राज्य किशोरी खो-खो स्पर्धेत नाशिक संघाला उपविजेतेपद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नाशिक ः धुळे येथे महाराष्ट्र खो-खो संघटना आणि श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे झालेल्या राज्यस्तरीय किशोरी खो-खो स्पर्धेत नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपविजेतेपद मिळवले. गेल्यावर्षी याच संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदाला गवसणी घातली होती. 

नाशिक ः धुळे येथे महाराष्ट्र खो-खो संघटना आणि श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे झालेल्या राज्यस्तरीय किशोरी खो-खो स्पर्धेत नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपविजेतेपद मिळवले. गेल्यावर्षी याच संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदाला गवसणी घातली होती. 
मुलींचा अंतीम सामना आज सकाळी नाशिक व पुणे या दोन संघात झाला. नाशिकने पहिल्या आक्रमणात 5 गडी बाद केले. पुणे संघाने 9 गडी बाद केले. मध्यंतराला पुणे संघाकडे 4 गुणांची आघाडी होती. तीच अखेर निर्णायक ठरली. नाशिककडून खेळताना ज्योती मेढे 1.40 व 1.30 मिनीट खेळत 1 गडी बाद केला. ललिता गोबले आणि सोनाली पवारने प्रत्येकी तीन गडी बाद केलेत. रंजना कोटीलने 1.10 मिनिटे खेळत 1 गडी बाद केला. या चौघी मात्र संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत. अंतीम सामना पुणे संघाने 1 गडी व 5 मिनिट राखून जिंकला. या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळून नाशिकच्या मुलीने 101 गडी बाद केले. हा या स्पर्धेतील विक्रम आहे. नाशिकच्या संघाच्या प्रशिक्षक गीतांजली सावळे आणि संघ व्यवस्थापक कांतीलाल महाले होते. 

सोनालीने स्विकारले पारितोषिक 
उद्योजक भगवान दळवी यांच्या हस्ते उपविजेतेपदाचे पारितोषिक नाशिकच्या सोनालीने स्विकारले. खो-खो संघटनेचे प्रदेश सचिव संदीप तावडे, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, प्रा. डॉ. जे. पी. शेळके, डॉ. एस. टी. पाटील, माधवराव पाटील, संजय गिरासे, डॉ. दिनेश पाटील आदी उपस्थित होते. 

ललिता सर्वोत्कृष्ट आक्रमक 
स्पर्धेत सोनाली पवारने सर्वाधिक 29 गडी बाद केले आहेत. त्याचवेळी ललिता गोबालेने 21 गडी बाद करत सर्वोत्कृष्ट आक्रमक पारितोषिक मिळवले. तिने हे पारितोषिक सलग दुसऱ्या वर्षी मिळवले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात या दोघींची निवड झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Sport