INDvsWI : भारताचा विजयी संघ कायम; विंडीजची गोलंदाजी

cricket
cricket

चेन्नई : ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकली असली, तरी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिल्या दोन सामन्यांत चांगलाच थरार रंगला होता. आता वेळ आहे एकदिवसीय मालिकेची. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज (रविवार) होत असून, भारताने विजयी संघ कायम ठेवला आहे. विंडीजचा कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडीजकडे झुंज देण्याची क्षमता असली, तरी भारत या प्रकारात फार पुढे आहे. विंडीजविरुद्ध सलग दहावी द्विपक्षीय मालिका जिंकण्याची विराट सेनेला संधी आहे.

मालिका गमावण्याची स्थिती निर्माण झाल्यावर टीम इंडियाने मुंबईत थाटात विजेतेपदाचा बार उडवला होता. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांची बहरलेली फलंदाजी आणि त्यावर सोनेरी मुलामा देणारी विराटची फटकेबाजी, यामुळे गाडी पुन्हा एकदा रुळावर आली. त्यामुळे एकदिवसीय मालिकेतही भारताचे वर्चस्व अपेक्षित आहे.

भारतीय खेळाडू ट्‌वेन्टी-20 तून 50-50 षटकांच्या प्रकारासाठी गीअर बदलण्यात तरबेज आहेत, पण प्रकार कोणताही असला तरी वेस्ट इंडीज फलंदाजांचा भर आक्रमणावर असतो, त्यामुळे उद्याच्या सामन्यात वेस्ट इंडीजचे खेळाडू कोणत्या मानसिकतेने खेळतात यावर सामना किती षटकांचा होणार हे ठरणार आहे.

चौथ्या क्रमांकावर श्रेयसच
वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या चौथ्या क्रमांकावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात खल झालेला आहे. अखेर गेल्या काही सामन्यांपासून श्रेयस अय्यरच्या रूपाने भरवशाचा फलंदाज पुढे आला आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांच्यासह माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनीही अय्यरसाठी बॅटिंग केलेली आहे. ट्‌वेन्टी-20 मालिकेत अय्यरला फारशी संधी मिळालेली नसली, तरी आजच्या सामन्यात त्यालाच पसंती मिळाली. रोहित-राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे अशी फलंदाजीची क्रमवारी आहे. 

चेन्नईतील हवामानात अचानक बदल झाला आहे. गेल्या 24 तासांत पाऊस पडलेला आहे; मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या पावसाची शक्‍यता नाही. बऱ्यापैकी सूर्यप्रकाश असेल असा अंदाज आहे. उद्या हवामान पाहूनच अंतिम संघाची रचना केली जाईल.

वेस्ट इंडीजचा संघ बेभरवशाचा समजला जात असला, तरी शिमरॉन हेटमेर, निकोलस पूरम आणि शेय होप अशा नवोदित फलंदाजांवर त्यांची भिस्त आहे, परंतु हे तिन्ही फलंदाज आक्रमकतेबरोबर संयम दाखवणार का, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. अष्टपैलू रॉस्टन चेसमुळे संघाला समतोलपणा येऊ शकेल.

अंतिम संघ : भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा,के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, दीपक चहर, महम्मद शमी.
वेस्ट इंडीज : किएरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अम्ब्रीस, शेय होप,  रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेर, जेसन होल्डर, कीमो पॉल, हेडन वॉल्श, जोसेफ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com