esakal | महाराष्ट्र केसरी 2020 : कोल्हापूरच्या चार मल्लांचा सुवर्ण चौकार
sakal

बोलून बातमी शोधा

4 wrestlers from Kolhapur won Gold medal in Maharashtra Kesari 2020

विजय करवीर तालुक्यातील पासार्डे गावचा आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील त्याचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. तो तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळला आहे. त्याने एशियन चॅम्पियनशिप 2019 मध्ये  रौप्यपदक पटकावले आहे.

महाराष्ट्र केसरी 2020 : कोल्हापूरच्या चार मल्लांचा सुवर्ण चौकार

sakal_logo
By
संदीप खांडेकर

पुणे : महाराष्ट्र केसरी 2020  कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या चार मल्लांनी आपापल्या वजनी गटांत सकाळच्या सत्रात सुवर्णपदकाचा चौकार ठोकला, तर एकाने कांस्यपदक पटकावले.  कुमार शेलार, विजय पाटील, अक्षय हिरुगडे व पृथ्वीराज पाटील यांनी सुवर्ण व ह्दयनाथ पाचाकटे याने कांस्यपदक मिळविले. पृथ्वीराजने पाचही लढती चितपट करत स्पर्धेत वेगळा ठसा उमटवला. अक्षय प्रेक्षणीय लढती करत सर्वोत्कृष्ट मल्ल ठरला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सिटी कार्पोरेशनतर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

आर्मीत असलेला कुमार कोतोली (ता. पन्हाळा) येथील असून त्याचे 74 किलो गटातील हे तिसरे सुवर्ण ठरले. यापूर्वी त्याने दोन रौप्य व एक कांस्यपदक मिळवले आहे. या स्पर्धेत त्याच्या एकूण सहा लढती झाल्या. त्यापैकी पाच लढती त्याने 10-0, तर एक 10-4 फरकाने जिंकली. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळण्यासाठी यापुढे प्रयत्न राहतील, अशी त्याने प्रतिक्रिया दिली. तो वस्ताद काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करतो‌. तत्पूर्वी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात होता. 

विजय करवीर तालुक्यातील पासार्डे गावचा आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील त्याचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. तो तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळला आहे. त्याने एशियन चॅम्पियनशिप 2019 मध्ये  रौप्यपदक पटकावले आहे.

अक्षय मूळचा बानगे (ता. कागल) येथील आहे. तो गतवर्षी दुखापतीमुळे स्पर्धेत उतरू शकला नव्हता. तो मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल सराव करत होता. आता तो वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. त्याने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व दोन कांस्य पदके पटकावली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणे हे ध्येय असल्याचे त्याने सांगितले. 

पृथ्वीराज देवठाणे (ता. पन्हाळा) येथील असून तो शिंगणापूरच्या शाहू कुस्ती केंद्राचा मल्ल आहे. तो तीन वर्षे केंद्रात सराव करत आहे. तत्पूर्वी तो गावातल्या जय हनुमान तालमीत होता. दुहेरी पट काढणे हा त्याचा हुकमी डाव आहे. तो माजगाव शिंदेवाडी येथील संजीवनीदेवी गायकवाड हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीत शिकत आहे. त्याचा भाऊ राजवीर हाही मल्ल आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. तो उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील यांचा पुतण्या असून, त्याला वस्ताद जालंदर मुंडे, सुनील फाटक, धनाजी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. 
हृदयनाथ पाचाकटेवाडी (ता. करवीर) येथील असून तो कुंभी कासारी कुस्ती संकुलात सराव करतो.

गटनिहाय विजेते अनुक्रमे असे :
65 किलो - माती 
- सूरज कोकाटे (पुणे जिल्हा)
- सोपान माळी (जळगाव)
- हृदयनाथ पाचाकटे (कोल्हापूर)

74 किलो ‌- मॅट 
- कुमार शेलार (कोल्हापूर जिल्हा)
- स्वप्नील काशीद (सोलापूर शहर)
- राकेश तांबूळकर (कोल्हापूर) व‌ अमित सूळ (कोल्हापूर जिल्हा)

६१ किलो ‌- मॅट
- विजय पाटील (कोल्हापूर जिल्हा)
- सागर बरडे (नाशिक जिल्हा)
- अनुदान चव्हाण (पुणे शहर) व‌ सौरभ पाटील (कोल्हापूर शहर) 

६५ किलो - मॅट
- अक्षय हिरुगडे (कोल्हापूर ‌जिल्हा)
- दयानंद पवार (लातूर)
- भाऊराव सदगीर (नाशिक जिल्हा) व भालचंद्र कुंभार (पुणे शहर)

९२ किलो ‌- मॅट 
- पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर जिल्हा)
- प्रदीप सस्ते (पिंपरी-चिंचवड)
- भैरू माने‌ (सोलापूर जिल्हा) व सागर मोहोळ (पुणे शहर)