हे तर चिंताजनकच !! लॉकडाऊनमुळे जगातील 50 टक्के क्रीडापटूंमध्ये नैराश्‍य... 

sportsman
sportsman

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्याचा परिणाम क्रीडा स्पर्धांवर झाला. त्यामुळे जगभरातील पन्नास टक्के क्रीडापटूंना सर्वोत्तम कामगिरीसाठी आपल्याला प्रेरित करणे अवघड जात असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने व्यक्त केले आहे. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने 135 देशांतील चार हजार खेळाडूंचे मत जाणून घेतले आहे. त्यातील अनेकांना सक्तीने सरावापासून वंचित रहावे लागले आहे. सर्वेक्षण केलेल्या क्रीडापटूंपैकी 56 टक्के खेळाडूंनी सराव योग्य प्रकारे होत नसल्याचे सांगितले. 32 टक्के खेळाडूंना मानसिक तंदुरुस्ती अवघड असल्याचे सांगितले, तर 30 टक्के खेळाडूंना आपल्यासमोर न्यूट्रिशन आणि डाएटचा प्रश्न असल्याचे सांगितले. 
ऑलिंपिक समितीने सपोर्ट स्टाफपैकी 528 सदस्यांचे मत जाणून घेतले आहे. त्यांनी 63 टक्के खेळाडूंना आपल्याला प्रेरित ठेवणे अवघड असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

कठोर प्रतिबंधामुळे सराव अवघडच झाला आहे, असे दक्षिण आफ्रिकेतील एका खेळाडूने सांगितले. सराव केला नाही, तर नकारात्मक विचार मनात येतात. त्याचा परिणाम मनावर होतो, असे त्याने नमूद केले आहे. 

सर्वेक्षणातील ठळक वैशिष्ट्ये 

  • ऑलिंपिक समितीच्या आवाहनास प्रतिसाद दिलेल्या खेळाडूंत भारतीयांचे प्रमाण 8 टक्के 
  • ब्राझील (12 टक्के), इटली (11 टक्के), जर्मनी (9 टक्के) भारतापेक्षा सरस 
  • ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकलेल्या अमेरिकेचा प्रतिसाद 6 टक्के, तर चीन सर्वोत्तम दहा देशांतही नाही. 

स्पर्धा संयोजकांसमोरील आव्हान 

  • स्पर्धा संयोजन अवघड असल्याचे 72 टक्के क्रीडा महासंघांचे मत 
  • खेळाडू तसेच मार्गदर्शकांच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण करणे अवघड होणार असल्याच्या प्रश्नाकडेही महासंघाने लक्ष वेधले आहे. 
  • क्रीडा स्पर्धांसाठी पुरस्कर्ते मिळवणे जास्त अवघड असल्याचे 48 टक्के महासंघाचा कौल 
  • स्पर्धा कधी सुरू होणार, त्या कशा सुरू राहणार याचा प्रश्न जास्तच बिकट 
  • आगामी आव्हानांबद्दल खेळाडूंशी संपर्क साधणे अवघड असल्याचे 62 टक्के महासंघांचे मत 
  • खेळाडूंना जास्तीत जास्त वैयक्तिक सरावासाठी प्रेरित करण्याचे आव्हान 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील सहभागाचे आव्हान सर्वात मोठे आहे. यासंदर्भात अनेक प्रश्न आहेत. त्याबाबतचे मळभ दूर केल्यास क्रीडापटू तसेच मार्गदर्शकांना आगामी स्पर्धांसाठी पूर्वतयारी करणे सोपे होऊ शकेल. 
- भारतातील क्रीडा पदाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com