इंग्लंडमधील राष्ट्रकुल ज्यूदो स्पर्धेत नाशिकच्या आकांक्षाला सुवर्ण

इंग्लंड - आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल ज्यूदो अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या नाशिकच्या आकांक्षा शिंदेसोबत अन्य देशांच्या खेळाडू.
इंग्लंड - आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल ज्यूदो अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या नाशिकच्या आकांक्षा शिंदेसोबत अन्य देशांच्या खेळाडू.

नाशिक - इंग्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल ज्यूदो चॅंपियनशिप स्पर्धेमध्ये नाशिकच्या आकांक्षा शिंदे हिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. प्री-कॅडेट वयोगटात ४८ किलोखालील वजनगटात सहभागी होताना आकांक्षाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तिच्या यशामुळे आकांक्षा ज्यूदो खेळात नाशिकमधील पहिली आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकप्राप्त खेळाडू ठरली आहे. 

या स्पर्धेचा समारोप शनिवारी (ता. २८) झाला. स्पर्धेत २० देशांनी सहभाग घेतला. भारत, इंग्लंड, स्कॉटलंड, बोस्निया, वेल्स, आयर्लंड, जमैका आदी देशांतील खेळाडूंमध्ये ही स्पर्धा झाली. आकांक्षाचे एकूण चार सामने झाले. इंग्लंडसोबत झालेल्या पहिल्या सामन्यात आकांक्षाने एका गुणाने विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडसोबत ओगोशी या डावपेचावर इप्पोन हा सर्वोच्च गुण घेत एकहाती सामना जिंकला. तिसऱ्या सामन्यात स्कॉटलंडच्याच खेळाडूला वाझारी गुणाच्या सहाय्याने विजय मिळवीत अंतिम सामन्यासाठी प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूवर एक वाझारी गुण मिळवत तिने सुवर्णपदक जिंकले.

आकांक्षाने आजवर विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत. ती सध्या योगेश शिंदे, सुहास मैंद, स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा ज्यूदो प्रशिक्षण केंद्रात सराव करते आहे. 
आकांक्षा सध्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेते आहे. स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेशचंद्र पांडा यांचेही सहकार्य लाभले.

आकांक्षाला स्पर्धेतील विजयासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन आदींनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com