
Suryakumar Yadav : मग सूर्याला टीममध्ये घेतलंच का... समालोचकानं थेटच विचारले
Suryakumar Yadav WTC Final Team India : बीसीसीआयने नुकतेच इंग्लंडमध्ये होणाऱ्या WTC Final साठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. चांगल्या लयीत आलेला भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा कसोटी संघात पुनरागमन केले आहे. याचबरोबर शार्दुल ठाकूरला देखील संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे केएल राहुललाही संघात स्थान मिळाले आहे. मात्र धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला डच्चू मिळाला आहे.
भारतीय निवडसमितीने फार कमी संधी देत सूर्यकुमार यादवला कसोटी संघातून डच्चू दिला. यानंतर भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने याबाबत ट्विट तर निवडसमितीला बोचणारे प्रश्न विचारले. सूर्यकुमार यादवला टी 20 मधील धडाकेबाज कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. मात्र त्याला एकाच सामन्यात अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने 8 धावा केल्या.
यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच होणाऱ्या WTC Final साठीच्या संघातून मात्र सूर्यकुमार यादवचा पत्ता कट करण्यात आला आहे. यावर आकाश चोप्रा ट्विट करून म्हणतो की, 'रहाणेसाठी मी खूष आहे. मात्र सूर्यकुमार यादवला संघातून आत बाहरे करणे पटते का?? आधी निवडच का केली... निवड केली ते केली एका सामन्यानंतर संघातून का वगळलं?'
आयपीएलच्या 16 व्या हंगामात सूर्यकुमार यादवकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र मुंबईकडून खेळणाऱ्या सूर्यकुमारला पहिल्या 6 सामन्यात फक्त 123 धावाच करता आल्या आहेत. दुसरीकडे अजिंक्य रहाणे आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 5 सामन्यात 209 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 52.25 आणि स्ट्राईक रेट 199.05 इतका जबरदस्त आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार