एबी डिव्हीलियर्स नावाचं वादळ शांत होणार!

योगेश कानगुडे
बुधवार, 23 मे 2018

मैदानावर चारही बाजूंनी फटके मारण्याच्या कलेमुळे सर्व जण त्याला 'मिस्टर 360' नावाने हाक मारतात. तो फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही परफेक्ट आहे. तो चेंडूवर इतक्या चपळतेने झेप घेतो की, चेंडू त्याच्या आजूबाजूने निघू शकत नाही. तो क्रिकेट खेळण्यात इतका मास्टर आहे की, त्याला देवाने फक्त या कामासाठीच बनवले की काय, असे वाटते. मुळात असे नाही. तो क्रिकेटशिवाय हॉकी, फुटबॉल, टेनिस, रग्बी, गोल्फ, आणि बॅडमिंटन उत्तम प्रकारे खेळू शकतो. आपल्या शालेय जीवनात त्याने या खेळात बरीच पदके जिंकली आहेत. इतके खेळ खेळणारा जगात दुसरा खेळाडू कोणीही नसावा. त्याच्या या प्रतिभेमुळे त्याला क्रीडा जगताचा "स्पायडरमॅन' म्हटले जाते.

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हीलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून धक्कादायक निवृत्ती स्विकारली आहे. आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक छोटासा व्हिडीओ शेअर करत डिव्हीलियर्सने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. ज्या मैदानावर डिव्हीलियर्सने पहिल्यांदा क्रिकेट सामना खेळला त्या टच क्रिकेट क्लबच्या मैदानावरुव व्हिडीओ शेअर करत डिव्हीलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. आतापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये मी खेळलो आहे, त्यामुळे यापुढच्या काळात तरुण खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी ज्या प्रकारे क्रिकेट सामने खेळतो आहे, त्यामुळे मला आता थकायला झालं आहे असं म्हणत डिव्हीलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

मैदानावर चारही बाजूंनी फटके मारण्याच्या कलेमुळे सर्व जण त्याला 'मिस्टर 360' नावाने हाक मारतात. तो फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही परफेक्ट आहे. तो चेंडूवर इतक्या चपळतेने झेप घेतो की, चेंडू त्याच्या आजूबाजूने निघू शकत नाही. तो क्रिकेट खेळण्यात इतका मास्टर आहे की, त्याला देवाने फक्त या कामासाठीच बनवले की काय, असे वाटते. मुळात असे नाही. तो क्रिकेटशिवाय हॉकी, फुटबॉल, टेनिस, रग्बी, गोल्फ, आणि बॅडमिंटन उत्तम प्रकारे खेळू शकतो. आपल्या शालेय जीवनात त्याने या खेळात बरीच पदके जिंकली आहेत. इतके खेळ खेळणारा जगात दुसरा खेळाडू कोणीही नसावा. त्याच्या या प्रतिभेमुळे त्याला क्रीडा जगताचा "स्पायडरमॅन' म्हटले जाते.

ए. बी. क्रिकेटच्या महान खेळाडूच्यां यादीत सामील आहे. त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत. मात्र, खूप कमी लोकांना माहिती आहे की, त्याला क्रिकेट खेळायचे नव्हते. त्याचे पहिले प्रेम तर टेनिस होते. तो टेनिसच्या सर्व प्रमुख स्पर्धा बघायचा. विंबल्डन जिकंण्याचे तो स्वप्न बघायचा. शिवाय टेनिसमध्ये सर्वोच्च स्थानी पोहचण्याचे लक्ष्य होते. मात्र, तो बनला क्रिकेटचा खेळाडू. ए.बी.चे वडील डॉक्टर होते. बालपणी मलासुद्धा वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायची इच्छा होती, असे त्याने एका मुलाखतीत म्हटले. मात्र, त्याला याच्या शिक्षणाची संधी मिळाली नाही. त्याचे संपूर्ण कुटुंब खेळाशी जुळालेले आहे. कुटुंबात खेळाबद्दल अतोनात प्रेम आहे. ए.बी. लहान होता, तेव्हापासून मैदानी खेळ खेळण्यास त्याने सुरुवात केली.

2004 साली आफ्रिकेच्या संघात पदार्पण केलेल्या एबीडी चा समावेश तसा मधल्या फळीतील फलंदाज आणि एक यष्टीरक्षक म्हणूनच. त्यावेळी बाउचर सारखा प्रतिभावान यष्टीरक्षक संघात असल्यामुळे एबीडीला यष्टिरक्षण करायची फारशी वेळ आली नाही. पण आपल्या फलंदाजीच्या आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याने कायमच कमाल केली. आधीच आफ्रिकन संघ म्हणजे प्रतिभावान क्षेत्ररक्षकांची खाणच. प्रत्येक क्षेत्ररक्षकाची तुलना होणार ती डायरेक्ट जॉन्टी ऱ्होड्स बरोबर. पण तरीही कोणत्याही दबावाला बळी न पडता डिव्हिलिअर्स कायमच संघासाठी आपले योगदान देताच राहिला. कधीही त्याने जॉन्टीची उणीव भासू दिली नाही. कायमच संघासाठी योगदान देणाऱ्या एबीडी हळूहळू संघातील इतर खेळाडूंचा आणि क्रिकेट रसिकांचा देखील आवडता खेळाडू बनला. 2014-15 ही वर्षे म्हणजे त्याच्या खेळातील सुवर्ण काळच म्हटला पाहिजे. एकदा मुंबई मध्ये त्याने आपल्या गोलंदाजांची जी कत्तल केली ती पाहून वाईट निश्चित वाटले, पण ती धुलाई एबी सारख्या खेळाडूंनी केली होती ह्याचा आनंद पण झालाच की. त्या वानखेडेवर 'एबी' 'एबी' च्या नावाचा जो जयघोष चालू होता, तो ऐकून प्रश्न पडावा कि सामना मुंबई मध्ये सुरु आहे कि डर्बन मध्ये.

वेगवान गोलंदाजांना पुढे येउन मिडविकेट किंवा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका मारणे मोठमोठ्या खेळाडूंना जमत नाही. पण एबी हे शॉट सहज खेळतो. समोर कोणताही गोलंदाज असो त्याला काहीही फरक पडत नाही. हातातल्या बॅटचा उपयोग चेंडू मारण्यासाठी करायचा असतो एव्हढच त्याला ठाऊक असावं. खेळताना फटके देखील उगाच वरवर मारलेले कधीच नसतात. अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करणे हा त्याचा स्थायीभाव आहे आणि एबी तेवढंच करतो. त्याने केवळ ३१ चेंडूत वेस्टइंडीज विरुद्ध केलेलं शतक म्हणजे क्रिकेट मधील संयमित आक्रमकतेचे अत्यंत उत्तम उदाहरण. ती खेळी बघून भल्या भल्या आक्रमक फलंदाजांनी आपली तलवार म्यान केली असेल.

आतापर्यंत डिव्हिलिअर्सने 114 कसोटी सामने, 228 वन डे सामने आणि 78 टी-ट्वेण्टी सामन्यांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 22 शतकं आणि 46 अर्धशतकं त्याच्या नावावर जमा आहेत. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 25 शतकं आणि 53 अर्धशतकं ठोकली आहेत. याशिवाय ट्वेण्टी 20 क्रिकेटमध्ये त्याने दहा अर्धशतकं केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. आपण दमल्याचं सांगत निवृत्ती जाहीर केली, मात्र आयपीएलच्या मैदानात डिव्हिलिअर्सने हवेत उडी मारुन पकडलेला झेल पाहून तो थकलाय, असं कोण म्हणेल, हाच प्रश्न पडतो. 

आता हे सर्व आपणाला अनुभवायला मिळणार नाही कारण त्याने निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या निर्णयाचा आपण आदर करून त्याला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊयात. 

Web Title: AB de Villiers retires from international cricket