अभय नेगीच्या 14 चेंडूतच 50

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

मेघालयाचा अष्टपैलू खेळाडू अभय नेगी याने मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेतील सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने मेघालयाविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 14 चेंडूतच ही कामगिरी केली.

मुंबई : मेघालयाचा अष्टपैलू खेळाडू अभय नेगी याने मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेतील सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने मेघालयाविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 14 चेंडूतच ही कामगिरी केली.

अभयने वानखेडे स्टेडियमवर रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडताना चौफेर फटकेबाजी केली. त्याने भारतातील स्पर्धेतील सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या के.एल. राहुलच्या विक्रमाशी बरोबरी केली. राहुलने 2018 च्या आयपीएलमध्ये मोहालीत ही कामगिरी केली होती. राहुलने चार षटकार आणि सहा चौकारांची बरसात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध धावांचा पाठलाग करताना केली होती.

अभयची कामगिरी जास्त आक्रमक होती. त्याने सहा उत्तुंग षटकारांना दोन चौकारांची जोड दिली. यातील चार षटकार लागोपाठच्या चेंडूवर होते. त्यामुळे मेघालयाने 20 षटकांत सहज 4 बाद 207 अशी मजल मारली. त्याला रवी तेजाच्या नाबाद 53 धावांची साथ लाभली. तो फलंदाजीस आला त्या वेळी मेघालयची धावसंख्या 4 बाद 149 होती. त्यांचा सामना होण्यापूर्वी मुंबईची लढत झाली होती. त्यातील पृथ्वी शॉ आणि आदित्य तरेच्या खेळीने त्याला आक्रमणासाठी जास्त प्रेरित केले असेल.

आयपीएलचा लिलाव जेमेतम महिन्यावर असताना अभयच्या खेळाची जास्तच चर्चा होईल. उत्तराखंडमध्ये जन्मलेला हा अष्टपैलू देशांतर्गत स्पर्धेत यापूर्वी त्रिपुराकडून खेळला आहे. त्याने गतवर्षी मेघालयाविरुद्ध शिलॉंगलाच राष्ट्रीय स्पर्धेतील पहिला सामना खेळला होता. त्याची पहिली ट्‌वेंटी 20 लढत बंगालविरुद्ध होती. अर्थात, राहुल तसेच अभयपेक्षाही सर्वांत वेगवान ट्‌वेंटी 20 अर्धशतक युवराज सिंगने पहिल्या विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेत 12 चेंडूत केले आहे. ही कामगिरी करतानाच त्याने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा षटकार मारले होते.

अखेरच्या षटकात फलंदाजीस आल्याने आक्रमण करण्याची संधी होती आणि त्याचा फायदा घेतला. माझ्या या धावांचा संघाला फायदा झाला याचा जास्त आनंद आहे.
- अभय नेगी

मेघालयाचा धडाकेबाज
- जन्म उत्तराखंडचा, पण लष्करात असलेल्या वडिलांचे शिलॉंगला पोस्टिंग आणि तिथेच शिक्षणही
- गतवर्षी त्रिपुराकडून प्रथम श्रेणी पदार्पण, पण त्या वेळी एकच सामना खेळला
- ईशान्य राज्यातील संघांना देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याची संधी. मेघालयचा संघ तयार झाल्याने मेघालयकडे
- महेंद्रसिंग धोनी आदर्श, त्याच्या भेटीनंतर सर्वोत्तम कामगिरीसाठी जास्त प्रेरित
- आयपीएलचा लिलाव नजीक आल्याने या खेळाची दखल घेतली जाईल, याची अभयलाही आशा
- रणजी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी फिटनेसकडे लक्ष देणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhay negi scored half century in 14 ball