‘गोल्डन फिंगर’ अर्थात अभिनव बिंद्रा

पीटीआय
बुधवार, 6 जुलै 2016

रिओनंतर आपण निवृत्त होणार हे शांत स्वभावाच्या नेमबाज अभिनव बिंद्राने जाहीर केले. त्यामुळे भारतीय नेमबाजीतील एक अध्याय संपणार. रिओत उद्‌घाटन सोहळ्यात तो भारताचा ध्वजधारक राहणार आहे. हा मान त्याला दुसऱ्यांदा मिळत आहे. यापूर्वी २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तो भारताचा ध्वजधारक होता. ऑलिंपिकमधील भारताचा एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेता ३३ वर्षीय अभिनवची कारकीर्द कुमार वयोगटापासूनच घडली. वयाच्या  १६ व्या वर्षी म्हणजे १९९८ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला संधी मिळाली. मात्र, त्यात त्याला फारशी चमक दाखविता आली नाही.

रिओनंतर आपण निवृत्त होणार हे शांत स्वभावाच्या नेमबाज अभिनव बिंद्राने जाहीर केले. त्यामुळे भारतीय नेमबाजीतील एक अध्याय संपणार. रिओत उद्‌घाटन सोहळ्यात तो भारताचा ध्वजधारक राहणार आहे. हा मान त्याला दुसऱ्यांदा मिळत आहे. यापूर्वी २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तो भारताचा ध्वजधारक होता. ऑलिंपिकमधील भारताचा एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेता ३३ वर्षीय अभिनवची कारकीर्द कुमार वयोगटापासूनच घडली. वयाच्या  १६ व्या वर्षी म्हणजे १९९८ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला संधी मिळाली. मात्र, त्यात त्याला फारशी चमक दाखविता आली नाही. पुढील दोन वर्षांत त्याच्या कामगिरीचा आलेख उंचावत गेला. त्यामुळे त्याची सिडनी ऑलिंपिकसाठी भारतीय संघात निवड झाली. या वेळी भारतीय संघातील सर्वात युवा क्रीडापटू होता. १० मीटर एअर रायफल प्रकारात प्राथमिक फेरीत तो अकरावा आला. त्याची अंतिम फेरी हुकली. ऑलिंपिकनंतर म्युनिच विश्‍वकरंडक स्पर्धेत ज्युनिअर गटात विश्‍वविक्रमासह ब्राँझपदक पटकाविले. २००२ ते २०१४ अशा सलग चार राष्ट्रकुल स्पर्धेत एअर रायफल प्रकारात त्याने सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली. त्यापैकी प्रथम तीनमधील सुवर्णपदक ही पेअर्स प्रकारातील आहे. २००६ हे वर्ष त्याच्यासाठी निर्णायक ठरले. राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके, त्यानंतर झाग्रेब येथे झालेल्या स्पर्धेत त्याने अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकाविले. मात्र, पाठीच्या दुखण्यामुळे त्याने दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेतील त्याच्या कामगिरीबाबत शंका उपस्थित केली जात होती. अभिनवने सर्वांची तोंडे गप्प करीत ७००.५ गुणांसह भारताला तब्बल २८ वर्षांनंतर पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले. चार वर्षांनंतर लंडनमध्ये त्याला अपयश आले. पाचव्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाची त्याची इच्छा सफल झाली. आता तो पाचवेळचे ऑलिंपिक विजेते स्वित्झर्लंडचे गॅब्रीले बुल्हमन यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीत सराव करीत आहे. रिओत त्याच्याकडून पदकाची अपेक्षा करण्यात येत आहे. अपेक्षांचे ओझे मोठे आहे. पण, ऑलिंपिक पदकाने कारकिर्दीची अखेर करण्यास तो निश्‍चित उत्सुक असेल, यात शंका नाही.

बिंद्राची ‘अभिनव’ कामगिरी
    २००० - अर्जुन,
    २००१ - राजीव गांधी क्रीडारत्न पुरस्कार
    २००९ - पद्मभूषण
    २००२ ते २०१० - राष्ट्रकुल स्पर्धेत पेअर्स प्रकारात सुवर्णपदक
    २००६ व २०१० राष्ट्रकुलमध्ये वैयक्तिक रौप्य व ब्राँझ
    २०१० आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक रौप्य
    २०१४ राष्ट्रकुलमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक
    २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धा सांघिक व वैयक्तिक ब्राँझ
(सर्व पदके १० मीटर एअर रायफल प्रकारात)
२०११ मध्ये प्रादेशिक सेनेकडून मानद लेफ्टनंट कर्नलची पदवी.

Web Title: Abhinav Bindra's Gold finger