अभिनव इंग्रजी माध्यम शाळेचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पुणे - स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धेत अभिनव इंग्रजी माध्यम प्रशालेने तीन सुवर्ण, एक रौप्य, तीन ब्रॉंझ अशी एकूण सात पदके मिळवून वर्चस्व राखले. यामध्ये अनया फडके हिने 14 वर्षांखालील गटात एकेरी आणि दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले. मिश्र दुहेरीत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पुणे - स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धेत अभिनव इंग्रजी माध्यम प्रशालेने तीन सुवर्ण, एक रौप्य, तीन ब्रॉंझ अशी एकूण सात पदके मिळवून वर्चस्व राखले. यामध्ये अनया फडके हिने 14 वर्षांखालील गटात एकेरी आणि दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले. मिश्र दुहेरीत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मॉडर्न क्रीडा संकुलात बुधवारी झालेल्या विविध वयोगटाच्या अंतिम फेरीत मुलींच्या 14 वर्षांखालील वयोगटात अभिनवच्या अनया फडके हिने सिंबायोसिसच्या सहन्या कुलकर्णी हिचा 21-8, 21-12 असा सहज पराभव केला. याच वयोगटात अनयाने नंतर गार्गी तेंडुलकरच्या साथीत दुहेरीतही सुवर्णपदक पटकावताना सिंबायोसिसच्या सहन्या कुलकर्णी- रिद्धी पुडके जोडीचा 21-15, 21-12 असा पराभव केला.

अभिनवच्या पार्थ घुबे- अद्वैत कामठे आणि शताक्षी किणीकर- ईशा पाठक यांनी सोळा वर्षांखालील गटात ब्रॉंझपदकाची कमाई केली. पार्थ- अद्वैतने स्प्रिंग डेल, वडगाव प्रशालेच्या हृषीकेश करमरकर- आर्यन खांडेकर जोडीचे आव्हान 21-9, 12-21, 21-19 असे परतवून लावले. शताक्षी- ईशाने बालशिक्षण प्रशालेच्या आभा जोशी- मानसी गोसावीचा 21-13, 21-7 असा पराभव केला.

मुलींच्या दुहेरीत ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागलेल्या शताक्षीने पार्थ घुबेच्या साथीत अभिनवला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांनी सिंबायोसिसच्या मिहिर आपटे- सनश्री ढमढेरे जोडीचा 21-12, 21-12 असा पराभव केला. शर्मन घुबे- निकिता भेडसगावकर जोडीने 12 वर्षांखालील गटात तिसरा क्रमांक पटकावला. त्यांनी कलमाडी प्रशालेच्या सर्वेश होईजी- रक्षा पंचांग जोडीचे आव्हान 21-12, 11-21, 21-19 असे परतवून लावले. मिश्र दुहेरीत अभिनवच्या अभिषेक नगरकर- अनया फडकेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांना सुलोचना नातू विद्यामंदिरच्या प्रतीक धर्माधिकारी- वैभवी कवठालकर जोडीकडून 21-23, 11-21 असा पराभव पत्करावा लागला.

Web Title: abhinav english medium school