अभिषेक, गुरिंदरवीरला सुवर्ण

अभिषेक, गुरिंदरवीरला सुवर्ण

बॅंकॉक (थायलंड) - भारताच्या धावपटूंनी दुसऱ्या आशियाई युवा मैदानी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन सुवर्णपदकांसह एक रौप्य आणि दोन ब्राँझ अशी एकूण पाच पदकांची कामगिरी केली. अभिषेक मॅथ्यू याने ८०० मीटर आणि गुरिंदरवीर सिंगने शंभर मीटर शर्यतीत सुवर्ण, तर सीमाने तीन हजार मीटर, तर अक्षय नैन याने ४०० मीटर शर्यतीत ब्राँझपदकाची कामगिरी केली. मुलांच्या गोळाफेक प्रकारात मोहित रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

या स्पर्धेत अभिषेक मॅथ्यू भारताचा पहिला सुवर्णपदक विजेता ठरला. त्याने ८०० मीटर शर्यतीत १ मिनीट ५४.९९१ सेकंद अशी सरस वेळ दिली. याआधी दोन वर्षांपूर्वी दोहा येथे बिआंत सिंगने या प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. या शर्यतीत अभिषेकने श्रीलंकेच्या हर्षा दिसनायका मुदियानसेला याचे कडवे आव्हान अवघ्या शतांश २ सेकंदाने मागे टाकले. हर्षाने १ मिनिट ५४.९९३ सेकंद अशी वेळ दिली. अभिषेकपाठोपाठ दिवसाच्या अखेरच्या शर्यतीत गुरिंदरवीर सिंगने शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकताना वेगवान धावपटूच्या किताबासह सुवर्णपदक जिंकले. त्याने १०.७७ सेकंद अशी वेळी दिली. मलेशियाचा महंमद अईदेल सा ॲडन रौप्य, तर कोरियाचा सुनजाए चोई ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. 

हिमाचल प्रदेशासारख्या डोंगरी भागातून आलेल्या सीमाने आशियाई स्पर्धेत भारताची लांब पल्ल्याच्या शर्यतीमधील पदकाची परंपरा  कायम राखली. यापूर्वी १९८० मध्ये सुमन रावत हिने लांब पल्ल्याच्या शर्यतीत असेच वर्चस्व राखले होते. सीमाने आज ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत १० मिनिट ५.२७ सेकंद अशी वेळ देत ब्राँझपदकाची कमाई केली. सीमाने आंतरराष्ट्रीय पदकाची कमाई केली असली, तरी तिला स्वतःचीच वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी साधता आली नाही. हैदराबाद येथे युवा राष्ट्रीय स्पर्धेत तिने ९ मिनिट ५६.२७ सेकंद अशी सरस वेळ दिली होती. कोरियाच्या चोई एल ग्याँग हिने १० मिनिट ९६ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक, तर व्हिएतनामच्या दोआन थु हॅंग हिने १० मिनिट २.१८ सेकंद वेळेसह ब्राँझपदक जिंकले. 

मुलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचा अक्षय ४८.४९ सेकंद वेळेसह ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. इंडोनेशियाच्या इफान अनुग्रह सेटिआवान याने ४७.४७ सेकंद अशा राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकली. मलेशियाचा महंमद सुहैमी रौप्यपदकाचा मानकरी ठरला. भारताला पाचवे पदक मोहितने गोळाफेक प्रकारात मिळवून दिले. त्याने १८.८२ मीटर अशी गोळाफेक करताना ही कामगिरी केली. तैवानचा पो एन यंग १९.४० मीटर कामगिरीसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. जपानच्या कांटा मात्सुडा याने ब्राँझपदक मिळविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com