तिरंदाजी विश्‍वकरंडक स्पर्धेत अभिषेकला रौप्य आणि ब्रॉंझपदक

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

भारताच्या अभिषेक वर्मा याने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात वैयक्तिक रौप्य आणि सांघिक ब्रॉंझ अशा दोन पदकांची कमाई केली. 

साल्ट लेक सिटी (अमेरिका) - भारताच्या अभिषेक वर्मा याने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात वैयक्तिक रौप्य आणि सांघिक ब्रॉंझ अशा दोन पदकांची कमाई केली. 

अभिषेकने उपांत्य फेरीत रशियाच्या ऍन्टॉन बुलाएवविरुद्ध खेळताना 150 गुणांची नोंद केली होती. मात्र, त्याला हे सातत्य अंतिम फेरीत अव्वल मानांकित आणि माजी विश्‍वविजेत्या डेन्मार्कच्या स्टिफन हॅनसेनविरुद्ध राखता आले नाही. एकतर्फी झालेल्या लढतीत अभिषेकला 123-140 अशी हार पत्करावी लागली. 

त्यापूर्वी ज्योती सुरेखा व्हेन्नामच्या साथीत खेळताना अभिषेकने अमेरिकेच्या जोडीवर चुरशीच्या लढतीत 147-140 असा पराभव करून मिश्र दुहेरीत ब्रॉंझपदकाची कमाई केली. 

भारताला आता ऑलिंपिक प्रकार असलेल्या रिकर्व्ह गटातही दोन पदकांची आशा आहे. अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या दीपिका कुमारी हिने पाच वर्षांनी वैयक्तिक प्रकारात प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर अतानू दासच्या साथीत ती मिश्र दुहेरीत ब्रॉंझपदकाची लढत खेळणार आहे. 

अभिषेकने 2015मध्ये पोलंड येथील स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. मात्र, या वेळी दुसरे सुवर्णपदक मिळविण्यात तो अपयशी ठरला. पहिल्या फेरीत हेनसेनबरोबर त्याने 26-26 अशी बरोबरी पत्करली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत त्याला दोन वेळा केवळ 8 गुणांचाच वेध घेता आला आणि तो मागे पडत गेला. तिसऱ्या फेरीतही त्याचे अपयश कायम राहिले. त्या वेळी तो 68-84 असा मागे पडला होता. अखेरच्या फेरीत त्याने 10 गुणांचा वेध घेतला खरा, पण तोवर उशीर झाला होता. 

Web Title: Abhishek Verma bags silver and bronze