निवड चाचणीबाबत सुशीलचे "कभी हा कभी ना' 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

रिओ ऑलिंपिकसाठी निवड चाचणी घेण्यासाठी न्यायालयात गेलेल्या सुशील कुमारने आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपली चाचणी घेऊ नका, असे पत्र लिहिले असल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली -रिओ ऑलिंपिकसाठी निवड चाचणी घेण्यासाठी न्यायालयात गेलेल्या सुशील कुमारने आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपली चाचणी घेऊ नका, असे पत्र लिहिले असल्याचे वृत्त आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष कुस्तीगीरांची चाचणी सोनेपतला 10 जूनला आहे, तर महिलांची चाचणी 17 जूनला अपेक्षित आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. भारतीय कुस्ती महासंघास न्यायालयाच्या आदेशामुळे चाचणीविना संघ निवडता येणार नाही; पण काही गटासाठी अपवाद करता येईल. 

दोन ऑलिंपिक पदके जिंकलेल्या सुशील कुमारसह बजरंग पुनिया आणि विनेश फोगतने चाचणीतून आपल्याला सूट देण्याची मागणी केली आहे. सुशीलची मागणी धक्कादायक आहे. 2016 च्या रिओ ऑलिंपिकसाठी नरसिंग यादवने 74 किलो गटासाठी पात्रता मिळवली होती. त्या वेळी ऑलिंपिकसाठी चाचणी घेण्याची मागणी सुशीलने केली होती, एवढेच नव्हे तर तो न्यायालयात गेला होता. त्या वेळी भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिंपिक पात्रता मिळवणाराच कुस्तीगीर स्पर्धेस जातो याकडे लक्ष वेधले होते. 

चाचणीत सहभागी झाल्यास त्याचा सरावावर परिणाम होईल, त्यामुळे त्यातून सूट देण्याची विनंती सुशीलसह तीन कुस्तीगीरांनी केल्याची भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थात आम्ही सर्व बाबी विचारात घेऊनच याबाबत निर्णय घेणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

सुशीलने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या चाचणीत परवीन राणाचा पाडाव केला होता. आशिया स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेला परवीन सध्या जखमी आहे. त्यामुळे सुशीलला पात्रतेत आव्हान नसेल. हेच जागतिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि राष्ट्रकुल स्पर्धा सुवर्णपदक विजेती विनेश फोगतने म्हटले आहे.

Web Title: About test sushil says smetimes yes somtimes no