ODI World Cup 2023 : आशिया कप आयोजन हातातून गेल्यानंतर पाकिस्तान वनडे वर्ल्डकपमध्ये पाय आडवा घालण्याच्या तयारीत | India vs Pakistan | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ODI World Cup 2023  India vs Pakistan

ODI World Cup 2023 IND vs PAK : आशिया कप आयोजन हातातून गेल्यानंतर पाकिस्तान वनडे वर्ल्डकपमध्ये पाय आडवा घालण्याच्या तयारीत

ODI World Cup 2023 India vs Pakistan : गेल्या दोन दिवसापासून आशिया कप 2023 हा पाकिस्तानात नाही तर श्रीलंकेत घेण्याच्या हालचालींना जोर आला आहे. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव आशिया कपसाठी पाकिस्तानमध्ये आपला संघ पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने देखील बीसीसीआयची साथ देणेच पसंद केले आहे. त्यामुळे यंदाचा आशिया कप पाकिस्तानमध्ये नाही तर श्रीलंकेत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.

आपल्या देशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे पुन्हा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला आशिया कपचे यजमानपद गमावण्याने मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान आता भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये काहीतरी अडचण निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

आशिया कप 2023 चे यजमानपद हातून जात असलेल्या पाकिस्तानने यावर सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यंदाचा वनडे वर्ल्डकप हा भारतात होणार आहे. याचे पूर्ण वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. मात्र सामने कोणत्या स्थानावर खेळले जाणार आहेत याची यादी समोर आली आहे. याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा क्रिकेट संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळण्यास नकार देऊ शकते. पाकिस्तानातील जिओ न्यूजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार पाकिस्तान काही करणांमुळे भारतासोबत नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात तयार नाही.

जरी भारत आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसला तरी पाकिस्तानला वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात यावेच लागणार आहे. कारण वर्ल्डकप ही आयसीसीची स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत आशिया कपचे यजमान पद गमावलेले पाकिस्तान अजून एक अट समोर ठेऊ शकते. जर पाकिस्तानचा संघ वनडे वर्ल्डकपसाठी भारतात आला तर 2025 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत देखील पाकिस्तानमध्ये येईल असे पीसीबी बीसीसीआयकडून लिखित आश्वासन घेण्याच्या तयारीत आहे.

(Sports Latest News)