द्रविडला काय बोलता? प्रत्येक व्यवसायात हितसंबंध असतातच 

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

"बीसीसीआय'चे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी परस्पर हितसंबंधाच्या मुद्यावर राहुल द्रविडला नोटिस बजावल्यानंतर अनेक मतप्रवाह पुढे येत आहेत. यावर माजी कर्णधार अनिल कुंबळे याने "प्रत्येक व्यवसायात हितसंबंध असतात. आपण त्याच्याशी कसा व्यवहार करतो यावर त्याची तीव्रता अवलंबून असते.' अशी मार्मिक टिप्पणी केली. 

पणजी : "बीसीसीआय'चे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी परस्पर हितसंबंधाच्या मुद्यावर राहुल द्रविडला नोटिस बजावल्यानंतर अनेक मतप्रवाह पुढे येत आहेत. यावर माजी कर्णधार अनिल कुंबळे याने "प्रत्येक व्यवसायात हितसंबंध असतात. आपण त्याच्याशी कसा व्यवहार करतो यावर त्याची तीव्रता अवलंबून असते.' अशी मार्मिक टिप्पणी केली. 

हा मुद्दा इतका का चर्चेत येतो हेच कळत नाही, असे सांगून कुंबळे म्हणाला,""प्रत्येक व्यवसायच कशाला आयुष्याच्या प्रेत्क वळणावर आपल्याला या मुद्याला सामोरे जावे लागते. याला तुम्ही कसे महत्व देता आणि हे संबंध सर्वांसमोर कसे आणता हे सर्वांत महत्वाचे. जर, तुम्ही सर्व व्यवहार प्रामाणिकपणे जाहीर केले तर असे वाद उद्‌भवणार नाहीत.'' 

कुंबळेने या वेळी क्रिकेटपटू आणि त्यांचे निवृत्तीनंतरचे योगदान याविषयी देखील भाष्य केले. कुंबळे म्हणाला,""भारताकडून क्रिकेट खेळले आणि नंतर त्यांनी क्रिकेटसाठी आपला वेळ दिला असे क्रिकेटपटू फार कमी आढळतील. हे दुर्दैवी आहे. असे करू पाहणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूला परस्पर हितसंबधाच्या वादाला सामोरे जावे लागते. काहीच क्रिकेटपटू यातून बाहेर पडतात.'' 

द्रविडच्या आधी सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना देखील अशाच वादाला सामोरे जावे लागले. दोघेही क्रिकेट सल्लागार समितीवर होते आणि बरोबरीने आयपीएल फ्रॅंचाईजवरही काम करत होते. 

सध्या तीनशे निवृत्त क्रिकेटपटू असतील, तर त्यातील 50 टक्के खेळाडू क्रिकेटपासून दूर असावेत. जे काही क्रिकेटपटू काम करत आहेत. त्यांना रोखले जात आहे. तुम्हाला जर त्यांना काम करू द्यायचे नसेल, तुम्हाला त्यासाठी दुसऱ्या कुणाचा शोध घ्यावा लागेल. 
-अनिल कुंबळे, भारताचा माजी कर्णधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After giving notice to Rahul Dravid many opinion polls have come forward