आईच्या मृत्यूनंतरचा "तो' सर्वात वाईट दिवस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

स्पेनच्या राष्ट्रीय मार्गदर्शकपदावरून झालेली हकालपट्टी हा दिवस मी विसरूच शकणार नाही. माझ्या जीवनातील आईच्या मृत्यूनंतरचा तो सर्वात वाईट दिवस आहे, असे स्पेन संघाच्या मार्गदर्शकपदावरून हकालपट्टी करण्यात आलेले ज्युलेन लोपेतेगुई यांनी सांगितले. 
 

माद्रिद - स्पेनच्या राष्ट्रीय मार्गदर्शकपदावरून झालेली हकालपट्टी हा दिवस मी विसरूच शकणार नाही. माझ्या जीवनातील आईच्या मृत्यूनंतरचा तो सर्वात वाईट दिवस आहे, असे स्पेन संघाच्या मार्गदर्शकपदावरून हकालपट्टी करण्यात आलेले ज्युलेन लोपेतेगुई यांनी सांगितले. 

विश्‍वकरंडक स्पर्धा काही दिवसांवर आलेली असताना लोपेतेगुई यांनी स्पर्धेनंतर रेयाल माद्रिदचे मार्गदर्शकपद स्वीकारण्यास तयारी दाखवली. त्यामुळेच त्यांना स्पेन संघाच्या मार्गदर्शकपदावरून काही तासांत हटवण्यात आले. आता रेयाल माद्रिदची सूत्रे अधिकृतरीत्या स्वीकारल्यानंतरही लोपेतेगुई यांना राष्ट्रीय संघाच्या मार्गदर्शकपदावरून झालेली हकालपट्टी सलत आहे. 

आपण मार्गदर्शकपदाची घोषणा केल्यामुळे स्पेन महासंघ आक्रमक झाला आहे. यामुळे रेयाल माद्रिद नाराज आहेत. लोपेतेगुई आणि रेयाल माद्रिद यांच्यातील करारास अंतिम स्वरूप दिल्यानंतर लगेचच याबाबत स्पेन महासंघास याची माहिती देण्यात आली होती. आम्ही कोणापासून काहीही लपवले नाही, असेच रेयाल माद्रिदचे व्यवस्थापन सांगत आहे. लोपेतेगुई यांनी कालचा दिवस हा माझ्या आयुष्यातील आईच्या निधनानंतरचा सर्वात वाईट दिवस होता, तर आजचा दिवस सर्वात अविस्मरणीय आहे, असे रेयाल माद्रिद संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सांगितले. 

लोपेतेगुई यांनीही आपण स्पेन खेळाडूंना नियुक्तीची बातमी जाहीर होण्यापूर्वी सांगितली होती. त्यांनी माझे अभिनंदन केले होते. त्यांना याबाबत कोणताही प्रश्‍न नव्हता, असे सांगितले. स्पेन खेळाडूंनी या नियुक्तीबद्दल तसेच त्यांच्या हकालपट्टीबद्दल थेट टिप्पणी टाळली आहे. जे काही झाले ते विसरून विश्‍वकरंडकावर लक्ष केंद्रित करायला हवे एवढेच संघातील वरिष्ठ खेळाडू सर्जिओ रामोस आणि गेरार्ड पिक्वे यांनी सांगितले.

Web Title: After the mother's death its the worst day