'वर्ल्ड कप'साठी तिसरा सलामीवीर हवाय! रिषभ पंत की अजिंक्य रहाणे?

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

'विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी 15 भारतीय खेळाडू कोण असतील', यावर गेले काही महिने क्रिकेटविश्‍वात जोरदार चर्चा सुरू आहे. निवड समितीने या स्पर्धेसाठीचा संभाव्य संघ जवळपास निश्‍चित केला आहे, असे प्रसाद यांनी 'क्रिकइन्फो'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संभाव्य भारतीय संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी रिषभ पंत आणि अजिंक्‍य रहाणे यांना अजूनही संधी आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीच हे संकेत दिले आहेत. अष्टपैलू विजय शंकर यालाही भारतीय संघात स्थान मिळविण्याची अंधूक संधी असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले आहे. 

'विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी 15 भारतीय खेळाडू कोण असतील', यावर गेले काही महिने क्रिकेटविश्‍वात जोरदार चर्चा सुरू आहे. निवड समितीने या स्पर्धेसाठीचा संभाव्य संघ जवळपास निश्‍चित केला आहे, असे प्रसाद यांनी 'क्रिकइन्फो'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

'रिषभ पंतचा समावेश करायचा की नाही' हा एक प्रश्‍न निवड समितीला भेडसावत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे विजय शंकरचाही विचार सुरू आहे. 'गेल्या एका वर्षात पंतने केलेली प्रगती अविश्‍वसनीय आहे. त्याला अजून थोडा अनुभव हवा, असे आमचे मत आहे. याचसाठी शक्‍य तेव्हा त्याला भारत 'अ' संघाच्या सामन्यांमध्येही खेळविण्यात आले. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी तो नक्कीच शर्यतीत आहे', असे प्रसाद म्हणाले. 

महेंद्रसिंह धोनी हाच 'वर्ल्ड कप'मध्ये भारताचा मुख्य यष्टिरक्षक असणार आहे. त्याच्यासाठी राखीव यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिकसोबत पंतचेही नाव चर्चेत होते. पण गेल्या वर्षभरात कार्तिकने 'फिनिशर' म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे पंतला निव्वळ फलंदाज म्हणून संघात स्थान देता येऊ शकेल का, यावरही आता विचार सुरू आहे. के. एल. राहुलच्या खराब फॉर्ममुळे त्याच्याजागी पंतला स्थान मिळू शकते. 

राहुलच्या अनुपस्थितीत सलामीसाठी तिसरा पर्याय म्हणून अनुभवी रहाणेचाही विचार केला जाऊ शकतो. गेल्या वर्षी रहाणेने दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये रहाणेने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने 11 सामन्यांमध्ये 74.62 च्या सरासरीने 597 धावा केल्या आहेत. तरीही संथ खेळीमुळे रहाणेला एकदिवसीय संघातून बाहेर जावे लागले आहे. त्यामुळे हा अडथळा पार करून रहाणे 'वर्ल्ड कप'चे तिकीट मिळवू शकतो का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Rahane and Rishabh Pant may get World Cup 2019 birth