ली चोंग वेईचा विजेतेपदाचा चौकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

बर्मिंगहॅम (इंग्लंड) - आघाडीचा बॅडमिंटनपटू ली चोंग वेई याने रविवारी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. त्याने कारकिर्दीत चौथ्यांदा ही कामगिरी केली. महिला विभागात तैवानच्या तई त्झु यिंग हिने प्रथमच विजेतेपदाचा मान मिळविला.

बर्मिंगहॅम (इंग्लंड) - आघाडीचा बॅडमिंटनपटू ली चोंग वेई याने रविवारी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. त्याने कारकिर्दीत चौथ्यांदा ही कामगिरी केली. महिला विभागात तैवानच्या तई त्झु यिंग हिने प्रथमच विजेतेपदाचा मान मिळविला.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चोंग वेई याने प्रथमच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या चीनच्या शी युकी याची घोडदौड 21-12, 21-10 अशी सहज रोखली. तईने इंडोनेशियाच्या रॅटचेनॉक इंटॅनॉन हिचा प्रतिकार 21-16, 22-20 असा मोडून काढला.

विजयाने मतपरिवर्तन
कारकिर्दीत चौथ्यांदा बॅडमिंटनमधील या सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यावर ली चोंग वेई याने येथे परत न येण्याचा निर्णय मागे घेतला. चोंग वेई तेराव्यांदा या स्पर्धेत सहभागी झाला होता. तो म्हणाला, ""प्रत्येक वर्षा मी येथे येतो तेव्हा मी घरच्या प्रेक्षकांसमोरच खेळतोय असे वाटते. मी पुढील वर्षी विजेतेपद टिकविण्यासाठी नक्की येईन.'' चोंग वेईचा प्रतिस्पर्धी शी याने उपांत्य पेरीत लीन डॅनचा पराभव करून वेईला जणू इशाराच दिला होता. प्रत्यक्षात अंतिम सामन्यात तो चोंग वेईचा प्रतिकारच करू शकला नाही.

तईचे सातत्य
तईने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रॅटचेनॉक हिच्याकडून जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकन मिळविले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये तिने सुपरसिरीज फायनल्समध्येही तिच्यावर विजय मिळविला. तेच सातत्य तिने येथेही कामय राखले.

पहिली गेम 16-16 गुणांपर्यंच चुरशीची राहिली. त्यानंतर तईने सलग पाच गुण घेत पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेममध्ये रॅंटचेनॉक हिने आपल्या आक्रमक खेळाने सतत आघाडी राखली होती. तिने 20-18 असे दोन गेम पॉइंटही मिळविले; पण तईने पंचांच्या निर्णयाला आव्हान देत एक गेम पॉइंट वाचवला आणि नंतर सलग तीन गुण घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तई म्हणाली, 'लढत खूपच संघर्षपूर्ण राहिली. रॅटचेनॉक हिने सर्वोत्तम खेळ केला; पण प्रत्येक गुणाला "आता गुण द्यायचा नाही'असे मनाला समजावत होते. त्यामुळेच विजय मिळवू शकले.''

तिसरा मलेशियन खेळाडू
ली चोंग वेई याने चौथ्यांदा विजेतेपद मिळविले. यापूर्वी त्याने 2010, 11 आणि 14 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. या कामगिरीने त्याने आपल्याच देशाच्या वोंग पेंग सून आणि एडी चूंग यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. दोघांनी 150च्या दशकात अशी कामगिरी केली होती. त्या वेळी ऑल इंग्लंड स्पर्धा ही अनधिकृत जागतिक स्पर्धा म्हणून गणली जात होती.

माझा खेळ चांगला झाला; पण मी विजेतेपद मिळविले आहे, याच्यावर अजूनही माझा विश्‍वास बसत नाहीये.
- ली चोंग वेई

Web Title: all england badminton competition