भारतीय संघात चारही खेळाडू एकेरीचे

पीटीआय
बुधवार, 29 मार्च 2017

नवी दिल्ली - भारतीय टेनिस संघाचा न खेळणारा नवा कर्णधार महेश भूपती याने मंगळवारी उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी चार जणांच्या संघात एकेरीत खेळणाऱ्या चारही खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. लिऍंडर पेस आणि रोहन बोपण्णा या दुहेरीतील अनुभवी जोडीला त्याने राखीव खेळाडू म्हणून पसंती दिली आहे.

नवी दिल्ली - भारतीय टेनिस संघाचा न खेळणारा नवा कर्णधार महेश भूपती याने मंगळवारी उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी चार जणांच्या संघात एकेरीत खेळणाऱ्या चारही खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. लिऍंडर पेस आणि रोहन बोपण्णा या दुहेरीतील अनुभवी जोडीला त्याने राखीव खेळाडू म्हणून पसंती दिली आहे.

भारताने प्रथमच डेव्हिस करंडक लढतीसाठी चारही एकेरीतील खेळाडूंना पसंती दिली आहे. उझबेकिस्तानविरुद्धची ही लढत ७ ते ९ एप्रिलदरम्यान बंगळूर येथे होणार आहे. भूपतीने या लढतीसाठी रामकुमार रामानाथन (मानाकंन २६९), युकी भांब्री (३०७), प्रज्ञेश गुणेश्‍वरन (३२५) आणि एन. श्रीराम बालाजी (३५०) यांना अंतिम संघात स्थान दिले.

डेव्हिस करंडक लढतीत दुहेरीची लढत ही नेहमीच भारताची ताकद राहिली आहे. कर्णधार भूपतीदेखील दुहेरीतील तज्ज्ञ खेळाडू होता. असे असतानाही त्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. 

कर्णधाराशी चर्चा करूनच निवड समितीने संघ निवडला असल्याचे भारतीय टेनिस संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. संघातील सातवा खेळाडू म्हणून विष्णू वर्धनचाही समावेश करण्यात आला आहे. भूपतीने संघ निवडीचे समर्थन केले. तो म्हणाला, ‘‘खेळाडूंची सध्याची कामगिरी लक्षात घेऊनच निवड केली आहे. प्रत्यक्ष लढत सुरू झाल्यावर त्या वेळी असलेली परिस्थिती लक्षात घेऊन आवश्‍यकता भासल्यास आम्ही पेस किंवा बोपण्णाला खेळविण्याचा निर्णय घेऊ शकतो.’’

संघात निवडलेल्या खेळाडूंची कामगिरी
युकी भांब्री - न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीनंतर चंडिगड येथील आयटीएफ फ्युचर्स स्पर्धेत विजय, झुहाई आणि शेनझेन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक.

रामकुमार रामानाथन - 
मोसमात अडखळत सुरवात. चॅलेंजर स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये एक विजय.
बालाजी - सातत्यपूर्ण कामगिरी. तीन स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक. जोऱ्हाट येथे विजेतेपद, चंडिगडला युकीविरुद्ध पराभव, भिलाईत प्रज्ञेशकडून पराभव. याखेरीज फ्युचर्स स्पर्धेत दुहेरीत तीन विजेतिपदे.
प्रज्ञेश गुणेश्‍वरन - सहभाग खूप कमी. भिलाई फ्युचर्स स्पर्धेत विजेतेपद. दुबईत पात्रता फेरीत पराभव. क्‍योटो चॅलेंजर स्पर्धेत पात्रतेच्या अखेरच्या फेरीत पराभव.

नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल
उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी भारतीय कर्णधार महेश भूपती याने एकेरीच्या लढती खेळणाऱ्या खेळाडूंची निवड केली. डेव्हिस करंडक लढतीत निर्णायक ठरणाऱ्या दुहेरीच्या लढतीसाठी लिएँडर पेस आणि रोहन बोपण्णा या दुहेरीतील तज्ज्ञ जोडीला त्याने राखीव खेळाडू म्हणून पसंती दिली. भूपतीचा हा निर्णय टेनिस चाहत्यांच्या भुवया उंचावणारा ठरला असला, तरी टेनिस संघटक याकडे वेगळा विचार म्हणून बघत आहेत.

नवा कर्णधार, नवा विचार यामुळे भारतीय टेनिसमध्ये पुढे येत आहे असा मतप्रवाह टेनिस तज्ज्ञांमधून पुढे येत आहे. एकेरी खेळणाऱ्या खेळाडूंनीच दुहेरीची लढत खेळायची हा नवा प्रयोग या निमित्ताने भारताने केला आहे. त्याचे स्वागत व्हायला हवे. असा प्रयोग टेनिस विश्‍वाला नवा नाही. युरोपियन देश असा निर्णय नेहमीच घेत असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

एकेरीत खेळणाऱ्या खेळाडूंची निवड म्हणजे त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीला मिळालेली पावती आहे, असे म्हणून हा तज्ज्ञ म्हणाला, ‘‘नक्कीच, या निर्णयाचा भारतीय टेनिसला फायदाच होईल. नवोदित खेळाडूंना आपलाही विचार होऊ शकेल असा विश्‍वास मिळाला. त्यामुळे ते प्रेरित होऊन खेळतील. दरवेळेस तेच ते चेहरे संघात दिसलेच पाहिजेत असे नाही. शेवटी हा खेळ आहे. जबाबदारी पडल्यावर खेळाडूला कुठेही खेळता आले पाहिजे. एकेरीतील खेळाडू दुहेरी खेळू शकत नाहीत असे नाही. या निर्णयाकडे धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास अनेक नवोदित खेळाडू पुढे येतील.’’

Web Title: All four singles players in the squad