esakal | पोर्तुगालमध्ये रोनाल्डोचाच जयघोष
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्तुगालमध्ये रोनाल्डोचाच जयघोष

पोर्तुगालमध्ये रोनाल्डोचाच जयघोष

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लिस्बन - अतिरिक्त वेळेत एडरच्या जबरदस्त किकने ‘युरो’ विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या पोर्तुगाल संघाचे सोमवारी मायदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यजमान फ्रान्सवर मिळविलेल्या विजयाने एका रात्रीत सारा फुटबॉल संघ देशवासीयांच्या गळ्यातील ताईत बनला होता. 

विजयी संघ दुपारी विमानतळावर उतरला, तेव्हापासून सारे वातावरण तसेच होते. त्यांचा हिरो एडर होता, पण जयघोष रोनाल्डोचा होता. फ्रान्सवर मात करून अनपेक्षित युरो विजेतेपदाची भेट देणाऱ्या आपल्या खेळाडूंच्या स्वागतासाठी पोर्तुगाल नागरिक रस्त्यावर उतरले होते. नृत्य, गायनाबरोबर प्रत्येकाच्याच हातात देशाचा ध्वज फडकत होता. विजेतेपदानंतर रात्रीपासूनच सुरू झालेला जल्लोष खेळाडू मायदेशी परतल्यावर तर टिपेला पोचला होता. विमानतळावरून खेळाडू लगेच पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डीसूझा यांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर त्यांच्या मिरवणुकीला सुरवात झाली. 

खेळाडूंचे कौतुक करताना अध्यक्ष रिबेलो म्हणाले, ‘‘तुम्ही फुटबॉलमध्ये युरोपात सर्वोत्तम आहात हे दाखवून दिले. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही आव्हानात्मक आहात हेदेखील तुम्ही सिद्ध केले. रोनाल्डोच्या दुर्दैवी दुखापतीनंतरही तुम्ही कठिण काळात धीराने उभे राहिलात. त्याचे फळ तुम्हाला मिळाले. पोर्तुगाल नागरिकांना जल्लोषाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद !’’

रोनाल्डोदेखील या वेळी भावूक झाला होता. तो म्हणाला, ‘‘माझ्यासाठी असा अंतिम सामना अपेक्षित केला नव्हता. पण, मी आनंदी आहे. हे विजेतेपद तमाम पोर्तुगाल नागरिकांना अर्पण करतो. तुम्हीच आमच्यावर विश्‍वास दाखवला आणि तो आम्ही सार्थ करू शकलो याचा आम्हाला गर्व आहे.’’

सामन्याला उपस्थित असलेला पोर्तुगालचा माजी कर्णधार लुईस फिगो सातत्याने दडपणाखाली दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा जाणवत होती. मात्र, विजेतेपदानंतर ट्‌विटरवरून त्यांना ‘ट्रु चॅंपियन्स’ असे संबोधून त्यांचे कौतुक केले. दैनिकांनीदेखील ‘एपिक’, ‘एटर्नल’, ‘प्राईड ऑफ पोर्तुगाल’ अशा मथळ्यांनी संघाच्या विजयाचे वर्णन केले. 

35 सामने खेळल्यानंतर पोर्तुगालचे पहिले युरोपीय विजेतेपद
10 देशांना आतापर्यंत युरो विजेतेपदाचा मान
6 युरो अंतिम सामन्यात गोल करणारा एडर सहावा बदली खेळाडू. 
80 मिनिटे पोर्तुगालला गोलचा प्रयत्न करण्यासाठी लागलेला वेळ

loading image
go to top