ग्रॅंड चेस टूरमध्ये आनंदला उपविजेतेपद

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

 पॅरिस ग्रॅंड चेस टूर स्पर्धेत भारताच्या विश्वनाथन आनंद याचे विजेतेपद अर्ध्या गुणाने हुकले. रॅपिड- ब्लिट्‌झ प्रकारची ही स्पर्धा होती.

पॅरिस - पॅरिस ग्रॅंड चेस टूर स्पर्धेत भारताच्या विश्वनाथन आनंद याचे विजेतेपद अर्ध्या गुणाने हुकले. रॅपिड- ब्लिट्‌झ प्रकारची ही स्पर्धा होती.

फ्रान्सच्या मॅक्‍सिमे व्हॅचिएर लॅग्रवे याने ३६ पैकी २१ गुण मिळविले, त्याने रॅपिडमध्ये १३, तर ब्लिट्‌झमध्ये ८ अशी कमाई केली. आनंदने रॅपिड प्रकारात १० गुण झाले, तर ब्लिट्‌झमध्ये आनंद, हिकारू नाकामुरा व यान-क्रिझ डुडा यांचे प्रत्येकी सर्वाधिक १०.५ गुण झाले. पन्नाशीतील आनंदने ब्लिट्‌झ प्रकारात शेवटच्या ६ फेऱ्यांत कारकिर्दीच्या प्रारंभी मिळालेले ‘लाइटनिंग कीड’ हे बिरुद सार्थ असल्याची प्रचिती दिली.   त्याने १३ व्या फेरीत ॲलेक्‍झांडर ग्रिशूक, १४ व्या फेरीत फॅबियानो करुआना, १५ व्या फेरीत नाकामुरा, तर अखेरच्या फेरीत रशियाच्या इयन नेपोम्नित्ची अशा चार मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. २ डाव बरोबरीत सुटले. लॅग्रवेला विजेतेपद मिळाले असले तरी ब्लिट्‌झमध्ये त्याला १०२ फिडे गुणांचा मोठा फटका बसला. अग्रस्थानावरून त्याची २८३७ रेटिंगसह चौथ्या स्थानी घसरण झाली. मात्र, आनंदने ६१ गुणांची कमाई करत १३ क्रमांकाने वरचे म्हणजे ११ वे स्थान प्राप्त केले. लॅग्रवेला ३७, ५००, तर आनंदला २५ हजार डॉलरचे बक्षीस मिळाले.

तरुण प्रतिस्पर्ध्यांना शह 
आनंदने २००३ मध्ये रॅपिड प्रकारात जगज्जेतेपद प्राप्त केले होते. त्यानंतर १४ वर्षांनी म्हणजे २०१७ मध्ये त्याने पुन्हा जगज्जेतेपद प्राप्त केले. या स्पर्धेत त्याने तरुणाई विरुद्ध सरस कामगिरीची नोंद करून पुन्हा जगाचे लक्ष वेधले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand reached an excellent second place