esakal | ओडिशाविरुद्ध बावणेचे द्विशतक
sakal

बोलून बातमी शोधा

ओडिशाविरुद्ध बावणेचे द्विशतक

ओडिशाविरुद्ध बावणेचे द्विशतक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रणजी करंडक साखळी क्रिकेट
पुणे - रणजी करंडक साखळी क्रिकेट स्पर्धेत अंकित बावणेचे द्विशतक, ऋतुराज गायकवाड, नौशाद शेखने केलेल्या शतकांच्या जोरावर यजमान महाराष्ट्राने ओडिशाविरुद्ध पहिला डाव पाच बाद ५४३ धावांवर डाव घोषित केला व महाराष्ट्राने पहिल्या डावात २५० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर ओडिशाने दुसऱ्या डावात बिनबाद २४ धावा केल्या होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर सुरू असलेल्या या लढतीत ओडिशाच्या पहिल्या डावातील २९३ धावांस उत्तर देताना महाराष्ट्राने दुसऱ्या दिवसअखेर दोन बाद २१९ धावा केल्या होत्या. आज सकाळच्या सत्रात ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाला त्याने २१७ चेंडूंत अकरा चौकार आणि तीन षटकारांसह १२९ धावांची खेळी केली. 

ऋतुराज-अंकित या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ३८४ चेंडूंत २११ धावांची भागीदारी केली. अंकितने शतक झळकावले. अंकित-नौशाद जोडीने जोरदार खेळ केला. नौशादने १५७ चेंडूंत सात चौकारांसह १०० धावांची खेळी केली. अंकित-नौशाद जोडीने चौथ्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी केली. 

'या' कारणामुळे पुण्यात पुन्हा थंडी परतली!

अंकित बावणेने राहुल त्रिपाठीच्या साथीत महाराष्ट्राला सव्वापाचशे धावांचा टप्पा पार करून दिला, तर अंकितने द्विशतकही साजरे केले. त्याच वेळी महाराष्ट्राने डाव घोषित केला. अंकित बावणेने ४०६ चेंडूंत २१ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २०४ धावांची, तर राहुलने ४८ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांसह  ६५ धावांची खेळी केली.  ओडिशाने दुसऱ्या डावात दिवसअखेर बिनबाद २४ धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा शंतनू मिश्रा १४, तर अनुराग सरंगी दहा धावांवर खेळत होते. 

संक्षिप्त धावफलक : ओडिशा : पहिला डाव  - सर्वबाद २९३  आणि दुसरा डाव ११ -  षटकांत बिनबाद २४ (शंतनू मिश्रा खेळत आहे १४, अनुराग सरंगी खेळत आहे १०) वि. महाराष्ट्र : पहिला डाव -१४९.५  षटकांत ५ बाद ५४३ घोषित (अंकित बावणे नाबाद २०४, ऋतुराज गायकवाड १२९, नौशाद शेख १००, राहुल त्रिपाठी ६५, सूर्यकांत प्रधान -२-९२).