इंग्लंड-न्यूझीलंडमध्ये पुन्हा रंगली 'सुपर ओव्हर'; वर्ल्डकप फायनलची पुनरावृत्ती!

वृत्तसंस्था
Sunday, 10 November 2019

पावसाच्या व्यत्ययामुळे टी 20 मालिकेतील अखेरचा सामना 11 षटकांचा खेळविण्यात आला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 146 धावा केल्या.

ऑकलंड : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील 'सुपर ओव्हर'च्या थरारनाट्याचा ऍक्‍शन रिप्ले रविवारी (ता.10) इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांदरम्यानच पाहायला मिळाला. फरक इतकाच की या वेळी सामना टी-20 होता.

पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बरोबरी झाली. पण, त्यानंतर झालेल्या "सुपर ओव्हर'मध्ये इंग्लंडने नऊ धावांनी विजय मिळविला आणि मालिका 3-2 अशी जिंकली. 

- सलग दुसऱ्या वर्षी हॉकी विश्वकरंडकाचे भारतास यजमानपद

पावसाच्या व्यत्ययामुळे टी 20 मालिकेतील अखेरचा सामना 11 षटकांचा खेळविण्यात आला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 146 धावा केल्या. त्यानंतर ख्रिस जॉर्डनने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून इंग्लंडला (7 बाद 146) सामन्यात बरोबरी साधून दिली. त्यानंतर 'सुपर ओव्हर'मध्ये जॉनी बेअरस्टॉ आणि इयॉन मॉर्गन यांनी बिनबाद 17 धावा केल्या.

विश्‍वकरंडक स्पर्धेप्रमाणे 'सुपर ओव्हर' देखील बरोबरीत राहिली नाही. या वेळी न्यूझीलंड संघ तब्बल 9 धावांनी मागे राहिला. टीम सैफर्ट आणि मार्टिन गुप्टिल यांना ख्रिस जॉर्डनच्या षटकांत केवळ 8 धावा करता आल्या. यात सैफर्टची विकेटही गमवावी लागली. 

- रिषभचा विषय सोडा त्याला मोकळेपणाने खेळू द्या - रोहित

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुन्‍रोच्या झंझावातामुळे न्यूझीलंडला 11 षटकांत 5 बाद 146 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. टीम सैफर्ट यानेही 16 चेंडूंत 1 चैकार, 5 षटकारांसह 39 धावांचा तडाखा देत न्यूझीलंडचे आव्हान भक्कम केले होते. 

आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरवात अपयशी होती. तीन षटकांतच त्यानी तीन गडी गमावले होते. मात्र, जॉन बेअरस्टॉच्या 18 चेंडूंतील झंझावती 47 धावांमुळे त्यांना अखेरपर्यंत पाठलाग करणे शक्‍य झाले. सॅम करन, टॉम करन आणि ख्रिस जॉर्डन यांनी आपला वाटा उचलत इंग्लंड संघाला विजयापर्यंत नेले. पण, त्यांना निर्धारित षटकांत विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. 

- INDvWI Women : तिने 15 व्या वर्षीच मोडला 'मास्टर ब्लास्टर'चा विक्रम!

संक्षिप्त धावफलक 

न्यूझीलंड 11 षटकांत 5 बाद 146 (गुप्टिल 50 -20 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार, मुन्‍रो 46 -21 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, सैफर्ट 39 -16 चेंडू, 1 चौकार, 5 षटकार) बरोबरी वि. इंग्लंड 11 षटकांत 7 बाद 146 (बेअरस्टॉ 47 -18 चेंडू, 2 चौकार, 5 षटकार, सॅम करन 24, टॉम करन 12, जॉर्डन नाबाद 12, बोल्ट 2-35, सॅंटनेर 2-20, नीशाम 2-25) 

सुपर ओव्हर : इंग्लंड बिनबाद 17 वि.वि. न्यूझीलंड 1 बाद 8


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another Super Over Between England And New Zealand in Auckland