स्टेफीवरील विजय हाच सर्वोत्तम क्षण - अरांता सॅंचेझ

यूएनआय
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कारकीर्द घडवताना सर्वोच्च ध्येय ठेवा आणि ते गाठण्यासाठी संधीची वाट पाहा. मेहनत घेण्यास कमी पडू नका. 

- अरांता सॅंचेझ, स्पेनची माजी टेनिसपटू

नवी दिल्ली - जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकनावर असलेल्या स्टेफी ग्राफवर १९८९ मध्ये मिळविलेला विजय हाच कारकिर्दीमधील सर्वोत्तम क्षण असल्याचे स्पेनची माजी टेनिसपटू अरांता सॅंचेझ हिने सोमवारी येथे सांगितले. 

फ्रेंच ओपन वाईल्ड कार्ड स्पर्धेच्या घोषणेसाठी अरांता येथे आली होती. त्या वेळी तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कारकिर्दीत चार ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविणाऱ्या अरांता सॅंचेझ हिने या वेळी कुमार टेनिसपटूंशी देखील संवाद साधला. ती म्हणाली, ‘‘वयाच्या चौथ्या वर्षी टेनिस खेळायला सुरवात केली आणि १४व्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू बनले. १९८९ मध्ये पहिले फ्रेंच ओपन विजेतेपद मिळविले आणि १९९४ मध्ये जागतिक क्रमवारीत एकेरी आणि दुहेरीत अव्वल मानांकनापर्यंत पोचले. या सगळ्यात १९८९ मध्ये मिळविलेल्या फ्रेंच ओपनच्या विजेतेपदापेक्षा अंतिम लढतीत अव्वल मानांकित स्टेफीला हरवल्याचा मला अधिक आनंद होता. त्या वेळी स्टेफी जवळपास अडीच वर्षे अपराजित होती.’’

स्टेफीने १९८८ मध्ये चारही ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाबरोबर ऑलिंपिक सुवर्णपदकही मिळविले होते. त्यामुळे अशा खेळाडूवर मिळविलेला विजय नक्कीच महत्त्व राखून असतो. अरांता म्हणाली, ‘‘अंतिम लढतीच्या वेळी मी काहीशी निराश होते. पण, स्टेफीशी खेळायचे म्हणून नाही, तर फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठणारी मी पहिली स्पॅनिश खेळाडू होते. याचे दडपण अधिक होते.’’ अरांताच्या मनात इतक्‍या वर्षानंतरही ती लढत जशीच्या तशी घर करून होती. त्या लढतीत मिळविलेल्या प्रत्येक गुणानुसार तिने लढतीचे वर्णन केले.

अरांताने ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाबरोबर ऑलिंपिक पदकही मिळविले आहे. यामध्ये तिने ऑलिंपिक पदकाला विशेष महत्त्व दिले. अरांताने चार ऑलिंपिक पदके मिळविली आहेत. ती म्हणाली, ‘‘ग्रॅंड स्लॅम स्पर्धा दरवर्षी होते. ऑलिंपिक दर चार वर्षांनी होते. तुमची ऑलिंपिक पदकाची संधी हुकले, तर तुम्हाला त्या क्षणासाठी पुन्हा चार वर्षे प्रतिक्षा करावी लागते. व्यावसायिक टेनिसपेक्षा त्या स्पर्धेचे वातावरण आणि देशासाठी खेळण्याची भावना काही वेगळीच असते.’’ अरांताने बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि ब्राँझपदक मिळविले. त्यानंतर १९९२ आणि १९९६ मध्ये देखील तिने ऑलिंपिक पदक मिळविले.

Web Title: Arantxa Sanchez