ऑलिंपिक पात्रतेचा तिरंदाज दीपिकाकडून वेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

दीपिका कुमारीने भारताच्याच अंकिता भकतला पराजित करून आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या वेळी झालेल्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारतास एक पात्रता मिळवून दिली. ही केवळ सुरुवात आहे, बर्लिन स्पर्धेत सांघिक स्पर्धेचीही पात्रता मिळवण्याचा इरादा आहे, असे दीपिकाने सांगितले.

मुंबई : दीपिका कुमारीने भारताच्याच अंकिता भकतला पराजित करून आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या वेळी झालेल्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारतास एक पात्रता मिळवून दिली. ही केवळ सुरुवात आहे, बर्लिन स्पर्धेत सांघिक स्पर्धेचीही पात्रता मिळवण्याचा इरादा आहे, असे दीपिकाने सांगितले.

बॅंकॉकला झालेल्या या स्पर्धेपूर्वीच भारतीय पुरुष तिरंदाजांनी तीनही ऑलिंपिक पात्रता मिळवल्या आहेत, त्यामुळे लक्ष्य महिला तिरंदाजांकडेच होते. या स्पर्धेत एका संघाला एकच ऑलिंपिक पात्रता मिळणार होती. भारतीय तिरंदाज जागतिक संघटनेच्या ध्वजाखाली सहभागी झाले असले, तरी त्यांनी मिळवलेली पात्रता भारतास देण्यात येईल, असे जागतिक संघटनेने यापूर्वीच सांगितले होते.

अंकिता आणि दीपिकाने उपांत्य फेरी गाठल्यामुळे भारताची ऑलिंपिक पात्रता निश्‍चित झाली. अंकिताने ऐतिहासिक ऑलिंपिक पात्रता मिळवलेल्या भुतानच्या कर्मा हिला उपांत्य फेरीत हरवले. कर्मा ही ऑलिंपिकची पात्रता मिळवलेली भुतानची पहिली तिरंदाजी ठरली. दरम्यान, अव्वल मानांकित दीपिकाने अंकिताला 6-0 (27-24, 27-26, 27-26) असे सहज पराजित करीत बाजी मारली. उपांत्य फेरीपर्यंत अंकिताचे विजय दीपिकापेक्षा जास्त सफाईदार होते, पण दीपिकाने निर्णायक फेरीत कामगिरी उंचावली.

लक्ष्य साध्य झाल्याचे समाधान
आम्ही नर्व्हस होतो. त्यातच सकाळी जोरदार वारे वाहत होते. मी श्‍वास नियंत्रित राखण्याकडे लक्ष केंद्रित केले. त्याच वेळी तुला हे साध्य करायचे आहे असे मला बजावत होते. आता हे लक्ष्य साध्य झाल्याचे समाधान आहे, असे दीपिकाने सांगितले. स्पर्धेत सर्वोत्तम ठरूनच पात्रता मिळवण्याचे स्वप्न होते. त्याचबरोबर अतानूला (मिश्रदुहेरीतील सहकारी तसेच नियोजित वर) मी 28 गुणांचा वेध घेणार हे सांगितले होते. त्याने हसून मला शूट करण्यास सांगितले. तो माझ्या मनातले जाणतो. त्याच्या प्रोत्साहनाचा फायदा झाला असेही तिने सांगितले. दीपिका अर्थातच या कामगिरीवर पूर्ण समाधानी नाही. किमान एक पात्रता मिळवली, याचे संघास समाधान आहे. आता ही सुरुवात आहे. बर्लिन विश्‍वकरंडक स्पर्धेत पुढचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य असल्याचे तिने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: archer deepika secures olympic quota