अर्जेंटिनाने बचाव भक्कम करायला हवा 

अर्जेंटिनाने बचाव भक्कम करायला हवा 

विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिला सामना खेळताना नेहमीच दडपण असते. तुम्ही किती नावाजलेले आहात किंवा किती जोरदार तयारी केली आहे हे महत्त्वाचे नसते. स्पर्धेचा कार्यक्रम, वेगवेगळी स्टेडियम, प्रेक्षक आणि वातावरण तुमची क्षमता पाहत असते आणि हेच दडपण हा खेळ किती कठीण आहे हे दाखवत असतो. तुम्हाला लगेचच 1990 मधील अर्जेंटिना आणि कॅमेरून लढत आठवत असेल. पण दोन संघांत मोठे अंतर असल्याचा अपवाद वगळता बलाढ्य संघांना सलामीलाच धक्का सहन करावा लागलेला आहे. 

यंदा रशियात दक्षिण अमेरिकेतील बहुतेक संघांसाठी मार्ग सोपा नसेल. लिओनेल मेस्सी असलेल्या अर्जेंटिनाचा सलामीला आइसलॅंडविरुद्ध सामना होत आहे. ब्राझील आणि पेरू यांच्यासमोर स्वित्झर्लंड आणि डेन्मार्क यांचे आव्हान असणार आहे. केवळ कोलंबियासमोर जपानचे सोपे आव्हान असेल. 

अर्जेंटिनाने पात्रता स्पर्धेत केलेल्या खेळावर मी समाधानी नाही. केवळ मेस्सीच्या कौशल्यामुळे ते या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरू शकले. मधल्या आणि बचाव फळीतील उणिवा स्पष्ट होत आहेत. या तुलनेत 2014 मध्ये त्यांची ही बाजू मजबूत होती. बाद फेरीत चार युरोपियन संघांसमोर त्यांनी केवळ एकच गोल स्वीकारला होता. याचाच अर्थ आता प्रशिक्षकांना या कमकुवत बाजूवर उतारा शोधावा लागणार आहे. आपल्या संघाला फार मित्रत्वाचे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही, हे प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पोली यांना लक्षात ठेवावे लागेल. 

सॅम्पोली यांना शिस्तबद्ध बचावाचे महत्त्व अधिक आहे. 2014 मध्ये मधली फळी जेव्हियर मस्कारेन्होने सक्षमपणे सांभाळली होती. आता तो संघात असला तरी पूर्वीइतका सक्षम राहिलेला नाही. त्यामुळे निकोलस ऑटामेंडीवर मोठी जबाबदारी आहे. बचाव फळीतील सर्व खेळाडू युरोपियन लीगमध्ये खेळतात; त्यामुळे त्यांना आपल्यावरील जबाबदारीची जाणीव असेल. चिकाटी आणि निर्धार हे अत्युच्च असणे आवश्‍यक असेल, कारण त्यांना गटातच आइसलॅंडसह क्रोएशिया आणि नायजेरिया यांचा सामना करायचा आहे. 

आइसलॅंडची ही पहिलीच विश्‍वकरंडक स्पर्धा असल्यामुळे त्यांना दुबळे समजणे मूर्खपणाचे ठरू शकेल. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पहिल्या वहिल्या युरो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती हे लक्षात ठेवावे लागेल. छोटे-छोटे पास देण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. व्यवहारात्मक फुटबॉल करून ते आपला बचाव अधिक भक्कमपणे सांभाळतात; म्हणून ते बलवान आहेत. परिणामी त्यांच्याविरुद्ध गोल करणे सोपे नाही. अशा अँडरडॉग्ज संघासमोर सुरवातीलाच गोल करणे कधीही महत्त्वाचे असते. जोपर्यंत गोल होत नाही, तोपर्यंत त्यांचा आत्मविश्‍वास वाढत जाईल आणि मग परिस्थिती अधिक कठीण होत जाईल. 

मेस्सीला हवी साथ 
लिओ(मेस्सी)च्या कौशल्याबाबत शंकाच नाही. आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हा कप मिळवलाच पाहिजे असे नाही; तरीही तो सर्वस्व देण्यासाठी सज्ज आहे आणि हीच बाब संघालाही स्फूर्ती देणारी आहे. त्याची देहबोली सकारात्मक आहे आणि कोणत्याही क्षणी कलाटणी देण्याचीही ताकद त्याच्याकडे आहे. 2014 च्या स्पर्धेत गोल करण्यात तो काही वेळा अपयशी ठरत होता; परंतु अशा स्थितीत त्याला सहकाऱ्यांकडून साथ मिळाली नव्हती. जोपर्यंत तो मैदानात असेल तोपर्यंत तो धोकादायक असेल. अर्जेंटिनाकडे काहीही करण्यासाठी क्षमता आहे, केवळ मेस्सीला साथ मिळायला हवी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com