मुंबईकर अरमान जाफरचे नाबाद त्रिशतक

मुंबईकर अरमान जाफरचे नाबाद त्रिशतक

मुंबई : रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या वासीम जाफरचा पुतण्या आणि हरहुन्नरी पृथ्वी शॉचा समवयीन सहकारी, परंतु 15 महिने मोठ्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावे लागलेल्या अरमान जाफरने पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात दणकेबाज नाबाद त्रिशतक केले. सी. के. नायडू 23 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अरमानने मुंबईकडून खेळताना सौराष्ट्रविरुद्ध ही खेळी शुक्रवारी साकार केली. 

वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अरमानने आपल्या आगमनाची वर्दी दिली. सोमवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या या सामन्यात धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईला निर्णायक विजयाची संधी आहे. 

सौराष्ट्राला पहिल्या डावात 175 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने 5 बाद 610 धावा केल्या. त्यानंतर आज तिसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्राची दुसऱ्या डावात 4 बाद 157 अशी अवस्था केली आहे. 

पृथ्वी शॉबरोबर शालेय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या अरमानकडेही काका वासीम जाफरप्रमाणे प्रगती करण्याची क्षमता असल्याचे मुंबई क्रिकेटमध्ये बोलले जात होते. 15 महिन्यांपूर्वी मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता. यंदाच्या मोसमात पूर्ण तंदुरुस्त होऊन परतल्यावर त्याने पहिल्याच सामन्यात त्रिशतक केले. यासाठी त्याने केवळ 367 चेंडूंचा सामना केला. त्यात 26 चौकार आणि 10 षटकारांची आतषबाजी केली. 

दोनदा चारशे धावा 
पाच वर्षांपूर्वी हॅरिस शिल्ड शालेय क्रिकेट स्पर्धेत अरमानने 473 आणि 498 अशा खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले होते; परंतु त्यानंतर होत राहिलेल्या दुखापतीमुळे त्याला सातत्य राखता आले नाही. 2016 मधील 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात त्याची निवड झाली होती; परंतु सहा सामन्यांत त्याला 44 धावाच करता आल्या होत्या. 2017 च्या आयपीएलमध्ये त्याची पंजाब संघात निवड झाली होती; परंतु एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. 

संक्षिप्त धावफलक 
सौराष्ट्र पहिला डाव : 175 आणि दुसरा डाव : 4 बाद 167. 
मुंबई, पहिला डाव : 5 बाद 610 घोषित (रुद्द धांडे 166, अरमान जाफर नाबाद 300- 367 चेंडू, 26 चौकार, 10 षटकार, शम्स मुलानी 87)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com