अंबाती झाला अवचित स्वयंचित

Ambati Rayudu
Ambati Rayudu

एक झुठ छिपाने के लिए सौ झुठ बोलने पडते है...अशी एक हिंदी उक्ती आहे. क्रिकेटपटू अंबाती रायुडू याच्या बाबतीत काहीसे असेच झाले आहे. स्वतःच्या हाताने टिम इंडियातील स्थान गमावलेल्या रायुडूने मग तोंड न उघडता एक कृती केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून बीसीसीयच्या राष्ट्रीय निवड समितीची खिल्ली उडविणारे ट्वीट करणे त्याला इतके महागात पडले, की आता त्याला निवृत्तीच जाहीर करावी लागली आहे.

एखाद्या व्यक्तीकडे नकारात्मकता किती असू नये, यासाठी रायुडूचे उदाहरण घ्यावे लागेल. वर्ल्ड कपसाठी खरे तर तो बदली खेळाडू होता, पण संघ जाहीर झाल्यानंतरची त्याची देहबोली नकारात्मक होती. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या वाटचालीत त्याचे योगदान उठून दिसत नव्हते. त्याच्याऐवजी 3D कौशल्य असलेल्या विजय शंकरला पसंती दिल्याचे निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी नमूद केले. त्यावरून रायुडूने वर्ल्ड कप बघण्यासाठी 3D गॉगल ऑर्डर केल्याचे ट्वीट केले. त्यापुढील इमोजी या त्याचा नकारात्मक दृष्टिकोन दाखविणाऱ्या होत्या.

रहाणेचे उदाहरण
रायुडूचे वय 34 आहे. त्याने तिशी पार केली आहे. 32 वर्षांचा असलेल्या अजिंक्य रहाणेपासून त्याने आदर्श घ्यायला हवा होता. रहाणे मागील वर्ल्ड कप खेळला. त्यानंतर त्याने झटपट क्रिकेटसाठी संघातील स्थान गमावले. कसोटी संघातील स्थान टिकविण्यासाठी सुद्धा त्याला संघर्ष करावा लागत आहे. वर्ल्ड कपसाठी रहाणेची निवड होणार नव्हती, पण पुनरागमन झाले नाही म्हटल्यावर रहाणेने इंग्लंडची वाट धरली. तो कौंटी क्रिकेट स्पर्धेत हॅम्पशायरकडून खेळतो आहे. शतक आणि दोन्ही डावांत भोपळा असे संमिश्र यश त्याला येत आहे. तो किती धावा करतो यापेक्षा कामगिरीत सुधारणा व्हावी, तंत्र भक्कम व्हावे, कौंटीचा अनुभव आपल्या खात्यात जमा व्हावा यासाठी रहाणे प्रयत्नशील आहे.

नकारात्मकता वाढत गेली
रायुडूने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. झटपट क्रिकेटला त्याने प्राधान्य दिले होते, पण वर्ल्ड कपसाठी मुळ संघात निवड न होणे, मग बदली खेळाडू म्हणून सुद्धा पत्ता कट होणे अशा नकारात्मक घडामोडींमुळे तो स्वतः आणखी नकारात्मक बनला. खरे तर त्याने मुळात ट्वीट डिलीट करून विराट सेनेला पाठिंबा देणारे कमेंट्स केले असते, तर ते जास्त उपकारक ठरले असते. त्यासाठी त्याने घुमजाव केले किंवा यु- टर्न घेतला, अशी मल्लीनाथी कुणी केली नसती. 

अजून कुणी तरी जायबंदी होऊ शकतो...
वर्ल्ड कप संपायला अजून 12 दिवस बाकी आहेत. भारतीय संघाचे तीनच सामने बाकी असले तरी 12 दिवसांच्या कालावधीत नेट प्रॅक्टीसच्या वेळी आणखी कुणी जखमी होऊ शकतो. त्यासाठी जसप्रीत बुमरा याचाच चेंडू लागण्याची गरज नाही. इतर कुणाचाही चेंडू लागून कुणीही जायबंदी होऊ शकतो, पण रायुडूने त्यापूर्वीच शर्यतीमधून माघार घेतली. विजय शंकर याच्याऐवजी मयांक अगरवाल याची निवड करताना निवड समिती व संघ व्यवस्थापनाने इतर काही नावांचा विचार नक्की केला असेल. त्यात बदली खेळाडू म्हणून रायुडूचे स्थान रद्द झाल्याचे निवड समितीने म्हटले होते. याचा अर्थ त्याची निवड झाली नाही हा भाग वेगळा असला तरी तो दुसरा बदली खेळाडू होता.

इम्रान खानचे उदाहरण
आता वर्ल्ड कप सुरु असल्यामुळे आपण अशक्यप्राय पुनरागमनाचा संदर्भ पाहूयात. त्यासाठी पाकिस्तानच्या इम्रान खान यांचे उदाहरण आदर्श ठरेल. त्याने निवृत्ती मागे घेतली. पुनरागमन केले. त्याचे आणि देशाचे जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार केले. क्रिकेट हा अमर्याद अनिश्चिततेचा खेळ असतो. सध्याच्याच पाक संघातील डावखुरे वेगवान गोलंदाज महंमद आमीर आणि वहाब रियाझ हे दोघे सुद्धा प्रेरक ठरू शकता. आमीर बदली खेळाडू होता, तर रियाझ कुठेच नव्हता. यानंतरही हे दोघे संघात आहे. रायुडू पुढील वर्ल्ड कप खेळू शकला असता का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज नाही, पण तो पुन्हा संघात स्थान नक्की मिळवू शकला असता. 

पाक व  इम्रान कशाला, दिनेश कार्तिक आहे की...
रायुडूने पाकिस्तानपर्यंत जाण्याची गरज नाही. खरे तर त्याने दिनेश कार्तिकचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवे होते. कार्तिकची जन्मतारीख 1 जुन 1985, तर रायुडूची 23 सप्टेंबर 1985 आहे. कार्तिकने 2007 नंतर वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळविले. 12 वर्षांनंतर तो वर्ल्ड कपमध्ये खेळला. ज्यावेळी तो प्लेईंग इलेव्हनमध्ये आला तेव्हा संघात तब्बल तीन यष्टिरक्षक होते. वर्ल्ड कप झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारताचा दौरा करणार आहे. त्यानंतर सुद्धा भरपूर क्रिकेट होणार आहे. अशावेळी रायुडूने निवृत्ती मागे घेऊन नव्या राष्ट्रीय मोसमासाठी सज्ज व्हायला हवे होते. त्याचे वय अजूनही उलटलेले नाही. तो ज्या हैदराबाद संघातून खेळतो त्यांच्यासाठी त्याचा अनुभव मोलाचाच ठरला असता. रायुडूने जिद्दीने पेटून उठत निवृत्ती मागे घेतली असती नेट प्रॅक्टीस करतानाचे, जिममध्ये वेट ट्रेनींग करतानाचे फोटो ट्वीटरवर पोस्ट केले असते तर त्याचे 3D ट्वीट लोक विसरले असते.

ऑफब्रेक मारा, यष्टिरक्षणाचे कौशल्य पाण्यात
रायुडूकडे ऑफब्रेक मारा आणि यष्टिरक्षण करण्याचे कौशल्य आहे. हे दोन्ही विकसित आणि वृद्घींगत करण्यासाठी त्याने काहीही प्रयत्न केले नाहीत. उलट बोलींग अॅक्शन अवैध असल्याची रिपोर्ट आल्यानंतर त्याने त्यात सुधारणा करण्यासही नकार दिला. बोलर म्हणून आपण फेक्या (चकर) नसल्याचे सिद्ध करून तो गोलंदाजीचे अतिरीक्त कौशल्य हे आपले बलस्थान ठरवू शकला असता, पण इथे पुन्हा त्याची नकारात्मकता आडवी आली.

युवराज, डेल स्टेनचे उदाहरण
रायुडूपेक्षा जास्त वय असलेल्या युवराज सिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांनी टी20 लीगला प्राधान्य दिले आहे. 38 वर्षीय युवराजला कॅनडातील टी20 लिगसाठी, तर 37 वर्षीय स्टेनला युरो टी20 लीगसाठी मार्की खेळाडूचा मान मिळाला आहे. रायुडूचे वय पाहिले तर त्याने नकारात्मकतेमुळे ही संधी गमावल्याचेही दिसते. 

समालोचन, प्रशिक्षणाचे पर्यायही धोक्यात 
रायुडूला ज्या परिस्थितीत निवृत्ती जाहीर करावी लागली ते बघता त्याला समालोचक किंवा प्रशिक्षक म्हणून कुणी पाचारण करेल अशी शक्यता दिसत नाही. अलिकडे टी20 लीगमुळे खेळाडूंसाठी निवृत्तीची वयोमर्यादा आड येत नाही.

थोडक्यात सांगायचे, तर टी-20 लीगमुळे क्रिकेट हा करीअरचा, पैसा-प्रसिद्धी मिळविण्याचा मार्ग बनला असताना रायुडूंचा अंबाती मात्र अवचित स्वयंचित झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील स्वयंप्रकाशित नव्हे, तर स्वयंचित तारा म्हणून त्याची नोंद करावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com