#SteppingOut : त्या खेळपट्टीवर 17 वर्षं खेळलो, आता निघायची वेळ आली

#SteppingOut :  त्या खेळपट्टीवर 17 वर्षं खेळलो, आता निघायची वेळ आली

एकीकडे भारतीय संघाची 2019 विश्वकरंडक स्पर्धेत यशस्वी वाटचाल सुरू असताना दुसरीकडे मात्र भारताला दोन विश्वकरंडक स्पर्धा जिंकून देणाऱ्या युवराजने आज आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धडाकेबाज फलंदाज ते अष्टपैलू खेळाडू हा युवराजचा प्रवास भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या 18 वर्षांमधील वाटचालीचा मोठा भाग आहे. परंतु खालावलेली कामगिरी आणि तरुण खेळाडूंच्या उदयामुळे युवराजसिंग सध्या कोणत्याच प्रकारामध्ये भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही, तरीही आजवरच्या त्याच्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही युवराजचे स्थान अढळ आहे. 

आज पर्यंत 300हून जास्त वनडे, 40 टेस्ट आणि 58 टवें20 खेळलेला युवराज गेल्या दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघात समाविष्ठ होण्यासाठी धडपडत होता. परंतु या वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठीचा संघ जाहीर झाला आणि त्यात युवराजच्या नावाची चर्चाही झाली नाही. कॅन्सरशी झुंज देऊन पुनरागमन करणारा युवराज.. आक्रमक फलंदाजी करणारा युवराज.. उपयुक्त फिरकी गोलंदाजी करणारा युवराज.. भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावणारा युवराज आता पुन्हा 'टीम इंडिया'तून खेळताना कधीच दिसणार नाही, यावर या संघनिवडीने शिक्कामोर्तब केले आहे. 

2000 साली झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून युवराजचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण झाले. पहिल्याच मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाला तडाखा दिला. त्यानंतर इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात महंमद कैफला साथीला घेत त्याने भारताला विजयाच्या मार्गावर नेले. तेव्हापासून भारतीय संघ युवराजकडे 'फिनिशर' म्हणून पाहू लागला. पदार्पणानंतर सात वर्षांनी, 2007 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या-वहिल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेतसुद्धा  युवराजसिंगने धुमाकूळ घातला होता. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला त्याने खेचलेले सलग सहा 
षटकार आजही क्रीडाप्रेमी विसरू शकलेले नाहीत. यानंतर 2011 साली मायदेशात संपन्न झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतसुद्धा युवराजने त्याच्या अष्टपैलू खेळीने स्वत : चा ठसा ऊमटवला होता.  नऊ सामन्यांमध्ये सगळ्यात जास्त सरासरीने युवराजने 362 धावा केल्या होत्या. 

यानंतर मात्र युवराजला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. पण यातूनही युवराजने उपचार घेतले आणि संघात पुनरागमन केले. नंतर मात्र मैदानात पुन्हा उतरलेल्या युवराजला स्वता : च्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. आणि त्याला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. परिणामी दोन वर्षांपूर्वीच युवराजने निवृत्तीचा विचार केला होता. पण कर्णधार विराट कोहलीने युवराजला पुन्हा एक संधी दिली. दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन झालेल्या युवराजला ही संधी साधण्यासाठी मोठ्या खेळीची गरज होती. इंग्लंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी युवराजला संघात स्थान मिळाले. 

या मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये झाला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताची सुरवात खराब झाली होती. धावफलकावर केवळ 25 धावा असताना के. एल. राहुल, शिखर धवन आणि कोहली बाद झाले होते. अशा परिस्थितीत युवराज आणि महेंद्रसिंह धोनी या अनुभवी फलंदाजांनी भारताचा डाव सावरला. युवराजने 127 चेंडूंत 150 धावा चोपल्या. त्यात 21 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. 

युवराज-धोनीच्या खेळीमुळे भारताने 381 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडला 366 धावांपर्यंतच मजल मारता आली. यात युवराजला 'सामनावीर' घोषित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना युवराजने निवृत्तीविषयीच्या विचाराचा उल्लेख केला होता. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दर्जा दाखवून देणार्‍या युवराजला आयपीएलमध्ये मात्र फारशी कमाल करता आलेली नाही. गेल्या ११ वर्षांमध्ये युवराज तब्बल पाच संघांकडून आयपीएल खेळला. एकाही संघाने त्याला दीर्घकाळ कायम ठेवले नाही.

आतापर्यंत युवराज आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून खेळला आहे. 2019 च्या आयपीएलच्या लिलावापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला करारमुक्त केले होते. याचवेळी एकेकाळचा संघ सहकारी आणि घनिष्ठ मित्र झहीर खान धावून आला आणि मुंबईच्या संघात त्याला स्थान मिळाले. परंतु त्या सिझन मधली त्याची कामगिरी अतिशय सर्वसाधारण होती.

आज के. एल. राहुल, केदार जाधव, हार्दिक पांड्या असे तरूण खेळाडू भारतीय संघात आपला ठसा उमटवत आहेत. या तरूण खेळाडूंचा उदय आणि खेळातील हरवलेल्या सुरामुळे भारतीय संघातील महान क्रिकेटपटूंपैकी एक, युवराज आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. त्याच्यी निवृत्ती क्रीडाप्रेमींसाठी जरी आश्चर्यकारक नसली तरी एका जिगरबाज, झुंजार खेळाडूला क्रीडाप्रेमी नक्कीच कायमस्वरूपी मुकणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com