Asia Cup 2018 : थरारक! भारत-अफगाणिस्तान सामना 'टाय'

Asia Cup 2018 : थरारक! भारत-अफगाणिस्तान सामना 'टाय'

दुबई : मोहंमद शेहजादने झळकावलेल्या धडाकेबाज शतकामुळे अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 8 बाद 252 धावांचे लक्ष्य उभारता आले. विजयाकरता 253 धावांचे असलेले आव्हान भारतीय फलंदाजांना सहज पेलता आले नाही. अखेर षटकातील 5व्या चेंडूवर जडेजा बाद झाला, तेव्हा धावा बरोबर झाल्या होत्या म्हणून सामना बरोबरीत सुटला. 

अफगाणिस्तान समोरच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करणार्‍या रोहित शर्मा आणि शिखर धवनला विश्रांती दिली गेली. सलामीला खेळायची संधी मिळालेल्या लोकेश राहुल आणि अंबाती रायुडुने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत शतकी सुरुवात करून दिली. 4 चौकार 4 षटकारासह रायुडु अत्यंत आक्रमक 57 धावा करून बाद झाला. स्पर्धेत प्रथमच फलंदाजी करायला मिळालेला राहुलही अर्धशतकावर समाधानी झाला. 

सामना रंगायला पंचांचे खराब निर्णय कारण ठरले. धोनी आणि दिनेश कार्तिकला पंचांनी पायचित दिले ते दोन्ही निर्णय चुकीचे होते. त्यातून केदार जाधव गोलंदाजाच्या हाताला चेंडू लागून धावबाद झाला. प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर अफगाणिस्तान संघाने विजयाकरता लागणार्‍या प्रत्येक धावेकरता भारतीय फलंदाजांना झगडायला लावले. शेवटच्या 3 षटकात 17 धावा भारतीय फलंदाजांना जमा करायच्या होत्या तेव्हा दोन फलंदाज पाठोपाठ धावबाद झाल्याने झटका लागला. शेवटच्या षटकात 7 धावा करायच्या असताना राशिद खान गोलंदाजीला आला. रवींद्र जडेजाने दुसर्‍या चेंडूवर चौकार मारला आणि तिसर्‍या चेंडूवर एकेरी धाव घेतली. दडपणाखाली खलीलने एकेरी धाव काढून सामना बरोबरीत आणला. पाचव्या चेंडूवर राशिद खानने जडेजाला झेलबाद केल्याने सामना बरोबरीत सुटला. 

त्या अगोदर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अफगाणिस्तान कप्तानाने घेतला. गोलमटोल शरीरयष्टीचा मोहंमद शेहजाद महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता आहे. धोनीच्या शैलीत फलंदाजी करणे त्याला आवडते. भारतासमोर सामना आणि धोनी कप्तानी करत असल्याने बहुतेक शेहजादला प्रोत्साहन मिळाले. अगदी सुरुवातीपासून शेहजादने टकाटक फटके मारणे चालू केले. 7 चौकार आणि 2 षटकारांसह 37 चेंडूत अर्धशतक शेहजादने केले तेव्हा समोरचा फलंदाज फक्त 3 धावा करू शकला होता. शेहजाद एकट्याने धावा जमा करत असताना समोरून धपाधप फलंदाज बाद होता होते. जडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद  केले ज्याचा काडीमात्र परिणाम शेहजादवर झाला नाही.

प्रत्येक भारतीय गोलंदाजाला शेहजादने टोलवले. शतकाजवळ गेल्यावर शेहजाद थोडा शांत झाला. फाईन लेगला फ्लिकचा चौकार मारून शेहजादने शतक पूर्ण केले तेव्हा भारतीय खेळाडूंनीही टाळ्या वाजवत त्याच्या खेळीचे कौतुक केले. शतकी खेळीत शेहजादने अर्धा डझन षटकार ठोकले होते. 116 चेंडूत 124 धावा काढल्यावर शेहजाद नावाचे वादळ शमले. केदार जाधवला षटकार मारायच्या प्रयत्नात शेहजाद बाद झाला. 11 चौकार आणि 7 षटकार शेहजादने मारले यावरून त्याच्या आक्रमक खेळीचा अंदाज लागेल. शेहजाद बाद झाल्यावर अनुभवी मोहंमद नबीने धावसंख्येला आकार देणारी 64 धावांची खेळी उभारली. रवींद्र जडेजाने पुन्हा 3 फलंदाजांना बाद करून चमक दाखवली. 50 षटकांचा खेळ संपला तेव्हा अफगाणिस्तानने 8 बाद 252 धावसंख्या उभारून भारताकरता आव्हान निर्माण केले होते. 

भारतीय संघाने झगडूनही विजयाची लक्ष्मणरेषा भारताला पार करता आली नसल्याने सामना बरोरीत सुटला. रोहित शर्माच्या गैरहजेरीत महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून धोनीचा हा 200वा एक दिवसीय सामना ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com