
Asia Cup 2023 : BCCI-PCB यांच्यातील वाद आणखी चिघळला! पाकच्या क्रिकेट बोर्ड अध्यक्षांनी पुन्हा दिली धमकी
PCB Chairman Statement Asia Cup 2023 : पाकिस्तान आणि भारतीय क्रिकेट संघासाठी आशिया कप हा चर्चेचा विषय ठरला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषक 2023 साठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही हे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर पाकिस्तानकडून असेही बोलले जात आहे की, असे झाल्यास पाकिस्तानचा संघ भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्येही खेळायला येणार नाही. या सगळ्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया चषकाबाबत वक्तव्य केले आहे. सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून भारतीय संघ ज्या प्रकारे पाकिस्तानात येण्यास नकार देत आहे, त्याच प्रकारे पाकिस्तानही भारतात येण्यास नकार देईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला यासंदर्भात बैठकही झाली होती, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता आयसीसीची पुढील बैठक 18 ते 20 मार्च दरम्यान दुबईत होणार आहे. अशा परिस्थितीत मी या बैठकीत हा मुद्दा नक्कीच मांडणार असल्याचे सेठी यांनी सांगितले. एवढेच नाही तर 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही सेठीने भारताला धमकी दिली. ते म्हणाले की हे केवळ आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाबद्दल नाही तर 2025 मध्ये होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल देखील आहे.