हॉकीत भारताची अंतिम लढत पाकिस्तानशी

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांनी तुल्यबळ दक्षिण कोरियाचे आव्हान पेनल्टी शूट आउटमध्ये 5-4 असे परतवून लावले. अंतिम फेरीच्या लढतीत भारताची गाठ आता पाकिस्तानशी पडणार आहे.

कुआनतान (मलेशिया) - कर्णधार गोलरक्षक श्रीजेशच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांनी तुल्यबळ दक्षिण कोरियाचे आव्हान पेनल्टी शूट आउटमध्ये 5-4 असे परतवून लावले. अंतिम फेरीच्या लढतीत भारताची गाठ आता पाकिस्तानशी पडणार आहे.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने नियोजित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर यजमान मलेशियाचे आव्हान पेनल्टी शूट आउटमध्ये 3-2 असे परतवून लावले. भारताने तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून, पाकिस्तान गतविजेते आहेत. भारत व दक्षिण कोरिया यांच्यातील सामन्यात एका गोलने पिछाडीवर राहिल्यानंतर भारताने नियोजित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सोडवला होता. त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये श्रीजेशने केलेल्या अप्रतिम गोलरक्षणाने भारताला विजय साकार करता आला. भारताकडून पाचही स्ट्रोक यशस्वी झाले.

उपांत्य फेरीत भारताची सुरवात जबरदस्त झाली होती. सामन्याच्या 15व्या मिनिटाला तलविंदर सिंगने गोल करून भारताला आघाडीवर नेले. आघाडी मिळविल्यानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावला होता. मात्र, बचावातील त्रुटी डोकेदुखी ठरत होत्या. सामन्याच्या 21व्या मिनिटाला इनवू सेओ याने मैदानी गोल करून कोरियाला बरोबरीवर नेले. कोरियाच्या वेगवान खेळाला उत्तर देताना भारतीय खेळाडूंची जरूर दमछाक होत होती. प्रतिआक्रमणात ते कमी पडत नव्हते, तरी त्यांना गोल करण्याची संधी मिळत नव्हती. 

दुसरीकडे सामन्याची वेळ संपत चालली तसा कोरियन खेळाडूंनी आपला खेळ अधिक वेगवान केला. याचा फायदा त्यांना झाला. सामना संपण्यास सात मिनिटे असताना जिहून यांग याने मिळालेली पेनल्टी स्ट्रोकची संधी अचूक साधत कोरियाला आघाडी मिळवून दिली. या वेळी भारतीय खेळाडूंनी इतिहास बदलला. दडपणाखाली त्यांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करून आक्रमणाला प्रतिआक्रमणाने चोख प्रत्युत्तर दिले आणि सामन्याच्या 55व्या मिनिटाला रमणदीपने भारताला बरोबरी साधून दिली. 

पेनल्टी शूट आउटमध्ये सरदारने भारताची सुरवात केल्यानंतर रमणदीप, रूपिंदर पाल, आकाशदीप यांनी पहिले चार प्रयत्न सहज यशस्वी केले. पाचव्या प्रयत्नात वीरेंद्र लाक्राला चुकीच्या पद्धतीने अडवल्यामुळे पंचांनी कोरियाला फाऊल देत भारताला थेट पेनल्टी दिली. त्यावर रूपिंदरने भारताचा पाचवा गोल केला. 

त्याचवेळी कोरियाकडून जुंग मॅन जाए, किम ह्येआँग जीन, ली जुंग जून यांनी आपले लक्ष्य सहज साधले. बाए जोंग सूक याला चौथ्या प्रयत्नांत श्रीजेशने चुकीच्या पद्धतीने अडवल्यामुळे मिळालेची थेट स्ट्रोकची संधी यांग जी ह्यून याने साधली. पण, पाचव्या प्रयत्नांत श्रीजेशन कोरियाच्या ली डाए येओल याचा फटका शिताफीने अडवला.

Web Title: Asian Champions Trophy 2016: India to Meet Arch-Rival Pakistan in Final