आशियाई स्पर्धेचा समारोप

आशियाई स्पर्धेचा समारोप

जाकार्ता - आशियातील खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रविवारी शानदार सोहळ्यात समारोप करण्यात आला. आशियाई ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष अहमद सबा यांनी स्पर्धेचा समारोप झाल्याची घोषणा केली. उद्‌घाटन सोहळा जितका आकर्षक ठरला, तितकाच समारोप सोहळादेखील डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

या स्पर्धेत आशियातील ४५ देशांनी सहभाग घेतला होता. समारोप सोहळ्याच्या सुरवातीला इंडोनेशियाची गायिका इशिआना सरस्वती हिच्या गायनाने रंग भरला. तिच्या कार्यक्रमाच्या वेळी भव्य स्क्रिनवर आशियाई स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांची झलक दाखविण्यात आली. त्यानंतर इंडोनेशियातील गायक आणि संगीतकारांनी समारोप सोहळ्यासाठी उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडूंना आपल्या तालावर ठेका धरायला लावले. इंडोनेशिया पोलिसांनी सादर केलेले ड्रमवादनही समारोप सोहळ्यात आकर्षण ठरले. 

संचलनात या वेळी खेळाडूंनी आपल्या देशांबरोबर संचलन करताना आपल्या सहभागी खेळातील अन्य देशांच्या खेळाडूंबरोबरही राहणे पसंत केले. भारतीय महिला हॉकीची कर्णधार राणी रामपाल या वेळी भारताची ध्वजधारक होती. उत्तर आणि दक्षिण कोरिया देशांनी पुन्हा एकत्रित केलेले संचलन आकर्षण ठरले. 

उद्‌घाटन सोहळ्यात बाईक स्टंट करणारे इंडोनेशियाचे अध्यक्ष जातो विडोडो यांनी आज समारोप सोहळ्यात अधिकृतपणे २०३२ ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. 

आशियाई ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष अहमद अल फहद अल अहमद अल सबा यांनी यशस्वी आयोजनासाठी इंडोनेशियाचे अभिनंदन केले. त्यानंतर आशियाई स्पर्धेचा ध्वज उतरविण्यात आला. अहमद सबा यांनी पुढील २०२२ आशियाई स्पर्धेचे आयोजक असलेल्या चीनमधील हाँगझू शहराच्या प्रतिनिधीकडे आशियाई स्पर्धेचा ध्वज सोपविला. 

३७ देशांना पदके
या स्पर्धेत सहभागी ४५ देशांपैकी ३७ देशांनी स्पर्धेत किमान एक तरी पदक मिळविले. त्याचबरोबर २८ देशांतील खेळाडूंनी किमान एक सुवर्णपदक पटकावले.

चीन सर्वोत्तम
क्रीडा महासत्ता बनू पाहणाऱ्या चीनने १३२ सुवर्ण, ९२ रौप्य आणि ६५ ब्राँझ अशी एकूण २८९ पदके मिळवून पदकतालिकेत अग्रस्थान पटकावले. जपान (७५, ५६, ७४ = २०५) दुसऱ्या, तर कोरिया (४९, ५८, ७० = १७७) तिसऱ्या स्थानावर राहिले. चीनच्या कामगिरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डायव्हिंग प्रकारातील दहाच्या दहा सुवर्णपदके चीनने पटकावली. याखेरीज या प्रकारात सहा रौप्यपदकेही त्यांच्या नावावर आहेत. 

भारताची पदके वाढली
भारताने या स्पर्धेत १९५१च्या नवी दिल्लीतील पहिल्या आशियाई स्पर्धेत मिळविलेल्या १५ सुवर्णपदकांची बरोबरी करताना २४ रौप्य आणि ३० ब्राँझ अशी एकूण ६९ पदके मिळवून आशियाई स्पर्धेतील आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने ग्वांगझू (२०१०) स्पर्धेत ६७ पदके मिळविली होती. भारताचे एकूण स्थान मात्र ८वे राहिले. 

थोडक्‍यात वैशिष्ट्ये
सुवर्ण पदके वाढवलेले देश
एकत्रित कोरिया संघ वगळता पाच देशांनी एका आशियाई स्पर्धेत आपली सुवर्णपदके वाढवली.
बहारिनने या स्पर्धेत १२ सुवर्णपदके मिळविली. २०१४ मध्ये ९
कंबोडियाने दोन सुवर्णपदकांची कमाई २०१४ मध्ये एकही नाही
इंडोनेशियाने ३१ सुवर्णपदके यापूर्वी जाकार्तातच १९६२ मध्ये ११
किर्गिझस्तान दोन सुवर्ण, २००२ आणि २०१० मध्ये प्रत्येकी १
उझबेकिस्तान २१ सुवर्ण, २००२ मध्ये १५
भारत १५ सुवर्ण, यापूर्वी नवी दिल्लीत १९५१ मध्ये तेवढीच

ज्येष्ठ आणि युवा पदक विजेते
    इंडोनेशियाचा बुंगा निमास या स्पर्धेतील सर्वांत युवा पदक विजेती
    तिने स्केट-बोर्डिंग प्रकारात ब्राँझपदक मिळविले. वय १२ वर्षे १३८ दिवस
    झॅंग मिनिजिये ही चीन सर्वांत युवा सुवर्णपदक विजेती ठरली. १४व्या वाढदिवशी तिने १० मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये सुवर्णपदक मिळविले
    इंडोनेशियाचा बामबॅंग हारटोनो पदक मिळविणारा सर्वांत ज्येष्ठ खेळाडू. त्याने ७८व्या वर्षी ब्रीज प्रकारात मिश्र दुहेरीत ब्राँझपदक मिळविले
    भारताचा प्रणव बर्धन हा सुवर्णपदक मिळविणारा ज्येष्ठ खेळाडू. त्याने ६०व्या वर्षी ब्रीजमध्ये सांघिक सुवर्ण मिळविले

अन्य विशेष
जपानने आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात एकूण ३ हजारांहून अधिक पदके मिळविली. 
जपानने स्पर्धेत आतापर्यंत १ हजारांहून अधिक सुवर्णपदके मिळविली. यात केन्सुके सासाओका याचे स्केटबोर्डमधील पदक हजारावे ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com