कोरियन साम्राज्याला दिले होते आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

तरुणदीप राय, तिरंदाज

तरुणदीप राय, तिरंदाज
विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय सातत्याने पदकाचा वेध घेतात. त्यामुळे आशियाई, ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांत भारतीय तिरंदाजी संघाकडून पदकाची अपेक्षा बाळगणे काही वावगे नाही. ऑलिंपिकमध्ये हुकलेला पदकाचा वेध किमान आशियाई क्रीडा स्पर्धेत तरी घेतला जाईल, ही सर्वसाधारण अपेक्षा असते. प्रत्यक्षात भारतीय तिरंदाजांसमोर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेइतकेच आव्हान आशियाई क्रीडा स्पर्धेतही असते. ऑलिंपिकमध्ये पदकांची लयलूट करणारे कोरिया, चीन, जपानचेच तिरंदाज आशियाई क्रीडा स्पर्धेतही असतात. त्यामुळे आव्हान तेवढेच असते. या वेळी रिकर्व्हसाठी अतानू दास वगळल्यास बहुतेक खेळाडू नवे आहेत. आपली निवड सार्थ ठरविण्याची संधी या खेळाडूंना आहे. कम्पाउंडच्या दुहेरीतही आपली बाजू भक्कम असेल. हा प्रकार आशियाई क्रीडा स्पर्धेत नुकताच आला आहे. त्यात रिकर्व्ह इतकी स्पर्धा नसली, तरी गाफील राहून चालणार नाही. त्यात समुद्रकिनारी परिसरात स्पर्धा आहे, वाऱ्यांचा वेग, सतत बदलणारी दिशा याचे आव्हान जास्तच असेल. कम्पाउंडमध्ये यश मिळावेच, त्याचबरोबर रिकर्व्हमध्येही हीच आशा आहे.

अशा आव्हानांचा अभ्यास करतो तेव्हा मला कोरियन वर्चस्वास आव्हान देऊन मिळविलेले रौप्यपदक आठवते. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनेकदा बलाढ्य कोरियाच्या तिरंदाजांना धक्का दिला आहे, पण सामन्याच्या दिवसाची कामगिरी, वातावरण, वाऱ्यांचा वेग, त्याची दिशाही महत्त्वाची ठरते. चार वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत मी  रिकर्व्ह प्रकारातील भारताचा वैयक्तिक पदकाचा दुष्काळ संपवताना रौप्यपदक मिळविले होते.

कोरियाच्याच स्पर्धकात अंतिम लढत गृहित धरण्यात आली होती. त्यास मी छेद दिला होता. उपांत्यपूर्व फेरीत ऑलिंपिक पदक विजेत्या कोरियन प्रतिस्पर्ध्यास हरवल्यामुळे माझ्याकडून सर्वांना सुवर्णपदकाच्याच आशा होत्या. अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्धीच आला होता. त्यांच्यासाठी ही लढत जास्तच प्रतिष्ठेची झाली होती. मला थोडक्‍यात हार पत्करावी लागली. पण, मला हरवल्यानंतर त्यांनी केलेला जल्लोष उपांत्यपूर्व फेरीतील हार त्यांना चांगलीच सलत होती, हे दाखवणारा होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत आपण भारतास सुवर्णपदक जिंकून देऊ शकलो नाही, हे मात्र मला त्या वेळी चांगलेच सलत होते. पण, माझी ही कामगिरी भारतीय तिरंदाजीसाठी खूपच मोलाची ठरली, याचे मला समाधान आहे. 
(शब्दांकन - संजय घारपुरे)

Web Title: Asian Games Archery India Corea