असंख्य अडचणींवर मात करून मिळविले पदक

असंख्य अडचणींवर मात करून मिळविले पदक

आंतरराष्ट्रीय स्पर्धा अनुभव, जागतिक खेळाडूंविरुद्ध वर्चस्व सध्या भारतीय बॅडमिंटनपटू राखत असताना त्यांच्याकडून पदकाची मोठ्या प्रमाणावर आशा बाळगणे, नक्कीच गैर नसेल. किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि बी. साई प्रणीत यांनी प्रभावी कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केली आहे. जागतिक क्रमवारीत श्रीकांत अव्वल आला आहे. भारतीयांचा उंचावलेला स्टॅमिना ही सर्वांत मोलाची बाब आहे. सात-आठ वर्षांपूर्वी भारतीय क्वचितच तीन गेमची लढत जिंकत असत. आता परिस्थिती नक्कीच बदलली आहे. उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाचे प्रतिबिंब त्यांच्या खेळात दिसत आहे. सुपर सिरीज स्पर्धेत दोघा भारतीयांतच अंतिम लढत झाली आहे. एकेरीतच नव्हे, तर दुहेरीतही प्रभाव पडत आहे. जागतिक स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीमुळे सात्विकसाईराजचा आत्मविश्‍वास उंचावलेला असेल. तो पुरुष दुहेरी, तसेच मिश्र दुहेरीत त्याला पदकाची संधी आहे.  एकंदरीत विचार केल्यास भारतास पुरुष एकेरीत दोन पदके जिंकता येतील, त्याचबरोबर दुहेरीतही पदकाची आशा अहे. सांघिक स्पर्धेतही आपण पदकापर्यंत पोचू शकतो. हा अंदाज वर्तवत असताना माझे मन माझ्या १९८२च्या भारतातच झालेल्या स्पर्धेतील पदकाच्या आठवणी जाग्या करीत होते. 

त्या स्पर्धेत प्रकाश पदुकोण व्यावसायिक आणि हौशी वादामुळे खेळू शकला नाही, पण तरीही त्या स्पर्धेत आपण पदके जिंकली. भारतासाठी विरळ असलेले पुरुष दुहेरीतील पदकही आपण त्या वेळी जिंकले आणि त्यात माझा सहभाग होता, याचा मला सार्थ अभिमान आहे. चीन, जपान,  कोरिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूरचा बॅडमिंटनमधील दबदबा तेव्हाही होता. भारतात आशियाई क्रीडा स्पर्धा असल्यामुळे पूर्वतयारीकडे जरा जास्त लक्ष दिले होते. प्रकाश नव्हता, पण तो आमच्याबरोबर सरावात सहभागी झाला. त्या वेळी आमची शिबिरे भारतात ठिकठिकाणी झाली. एका शिबिराच्या वेळी चांगल्या सुविधाच नव्हत्या. खाणेही चांगले नव्हते. आम्ही संघातील सर्व खेळाडू त्याविरोधात उपोषणास बसलो. स्पर्धा संयोजन समितीच्या  पदाधिकाऱ्यांनी आमची भेट घेतली. परिस्थितीत बदल झाला. अर्थात, हा अपवाद म्हणायला हवा. यानंतरही सरावात कोठेही तडजोड केली नाही. या सर्वांचे फलित म्हणूनच मी लेरॉय डिसाच्या साथीत ब्राँझ पदक जिंकले.

शब्दांकन : संजय घारपुरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com