esakal | Video : महाराष्ट्र केसरी 2020 : हलगी वाजली अन् पैलवानांनी ठोकला शड्डू!
sakal

बोलून बातमी शोधा

Video : महाराष्ट्र केसरी 2020 : हलगी वाजली अन् पैलवानांनी ठोकला शड्डू!

बोचऱ्या थंडीत सुरू झालेल्या लढतींत ‌मल्लांचा कस लागला. कडाडणाऱ्या हलगीला दाद मिळत असताना काटाजोड लढतींनी प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

Video : महाराष्ट्र केसरी 2020 : हलगी वाजली अन् पैलवानांनी ठोकला शड्डू!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सळसळत्या उत्साहात कुस्तीपटूंनी डावपेचांतील आक्रमकता दाखवत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे आज पारणे फेडले. दिवसभरात एकापेक्षा एक दिवस सरस लढती मैदानात झाल्या. हलगी, घुमकं, कैताळाच्या कडकडाटाने मैदानात रंग भरला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसभरात झालेल्या माती विभागात ५७ किलो गटात सोलापूरचा आबासाहेब अटकळे, तर ७८ किलो गटात उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सुवर्णपदक पटकाविले. 
या दोघांना गेल्या वर्षी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा त्यांनी सुवर्णपदक पटकाविण्याची किमया साधली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कार्पोरेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन केले आहे. बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर स्पर्धेस आज दिमाखात सुरवात झाली. 

- महाराष्ट्र केसरी 2020 : जाणून घ्या मानाच्या गदेचा इतिहास

अधिवेशनात ५७ व‌ ७९ किलो गटात मॅट व माती विभागातील लढतींना आज प्रारंभ झाला. बोचऱ्या थंडीत सुरू झालेल्या लढतींत ‌मल्लांचा कस लागला. कडाडणाऱ्या हलगीला दाद मिळत असताना काटाजोड लढतींनी प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आपापल्या आखाड्यातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षकांसह समर्थक मल्लांची घोषणाबाजी उत्साहात भर घालणारी होती. दुपारच्या विश्रांतीच्या सत्रानंतर झालेल्या लढतींनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ज्येष्ठ मल्ल, प्रशिक्षक यांची मैदानातील उपस्थिती लक्ष वेधणारी होती. 

आमदार महेश लांडगे व क्रीडा आयुक्त ओमप्रकाश भपोरिया यांच्या हस्ते अधिवेशनाचे औपचारिक उद् घाटन झाले. यावेळी आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार नानासाहेब नवले, सिटी कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, 
उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गटनेते भाऊसाहेब भोईर, अभिजित आंदळकर, तात्यासाहेब कोकणे, सतीश दराडे,‌ अॅड. तुषार पवार, आयोजन समितीचे सदस्य ललित लांडगे, नामदेव मोहिते, विवेक कुलकर्णी, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, अर्जुन वीर पुरस्कार विजेते काका पवार, सर्जेराव शिंदे‌ उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी प्रास्ताविक केले. 

- महाराष्ट्र केसरी 2020 : आखाडा बनविण्यासाठी लिंबू-कापूर-ताक-तेल ​

अंतिम निकाल असा : 
५७ किलो‌ :  माती विभाग 
सुवर्ण - आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा)
रौप्य- संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर)
कांस्य - ओंकार लाड (कोल्हापूर जिल्हा )

७९ किलो‌ : माती विभाग 
सुवर्ण- हणमंत पुरी (उस्मानाबाद)
रौप्य - सागर चौगुले (सोलापूर जिल्हा )
कांस्य- धर्मा शिंदे (नाशिक)

- Video : बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॅटिंगवर युवराज सिंग झाला फिदा!

मॅट विभागात ७९ किलो ‌गटात सोलापूरच्या रामचंद्र कांबळे याने कोल्हापूरच्या निलेश पवारला १३ विरुद्ध ४ तर उस्मानाबादच्या रवींद्र खरेने साताऱ्याच्या श्रीधर मुळेला ४ विरुद्ध १ गुण फरकाने पराभूत केले. उद्या (शनिवार) रामचंद्र कांबळे विरुद्ध रवींद्र खरे यांच्यात अंतिम लढत होईल.