WTC Final 2023: टीम इंडियाला टी-20 मधून कसोटीत जुळवून घेण्याची `कसोटी` | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final 2023 Aus vs Ind

WTC Final 2023: टीम इंडियाला टी-20 मधून कसोटीत जुळवून घेण्याची `कसोटी`

WTC Final 2023 Aus vs Ind : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ७ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंसमोर आव्हान असणार आहे. भारतीय संघातील खेळाडू गेले दोन महिने आयपीएलमध्ये खेळत होते.

आता त्यांना पाच दिवसांचा सामना खेळावयाचा आहे. टी-२० मधून कसोटीमध्ये खेळण्यासाठी त्यांना खेळपट्टी, वातावरणाशी जुळवून घ्यावे लागणार आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

सुनील गावसकर पुढे म्हणाले, आयपीएलमध्ये टी-२० प्रकार असतो. आता भारतीय संघ कसोटी क्रिकेट खेळणार आहे. क्रिकेटच्या या प्रकारांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतीय खेळाडूंना मानसिकता, तंत्र व दृष्टिकोन यामध्ये आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. कसोटी क्रिकेटसाठी लागणाऱ्या सर्व बाबी अंगवळणी आणाव्या लागणार आहेत, असे सुनील गावसकर पुढे स्पष्ट करतात.

चेतेश्‍वर पुजाराकडे अनुभव

चेतेश्‍वर पुजारा आयपीएलमधील कोणत्याही संघामध्ये सहभागी नव्हता. त्यामुळे यावेळेचा त्याने फायदा करून घेतला. तो इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाला. तेथील वातावरण व खेळपट्टी या दोन्हीशी त्याने जुळवून घेतले. याबाबत सुनील गावसकर म्हणाले, पुजारा हा भारतीय संघातील एकमेव खेळाडू आहे, तो इंग्लंडमधील वातावरणात खेळला आहे. त्याने येथील स्पर्धांमध्ये खेळून खेळपट्टी व वातावरणाशी जुळवून घेतले आहे. त्याच्याकडे अनुभव आहे. इतर खेळाडूंसाठी मात्र अंतिम लढत आव्हानात्मक असेल, असे सुनील गावसकरांना वाटते.

अजिंक्य रहाणेकडे सिद्ध करण्याची संधी

भारताच्या कसोटी संघातून बाहेर गेल्यानंतर आयपीएलमध्ये चमकदार खेळ करून अजिंक्य रहाणेने पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवले. यावर सुनील गावसकर म्हणतात, अजिंक्य रहाणेने इंग्लंडमध्ये धावा केलेल्या आहेत. त्यामुळे पाचव्या क्रमांकावर त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा बाळगता येणार आहे. आयपीएलमध्ये त्याने ठसा उमटवला. त्यामुळे भारतीय संघातील दरवाजे त्याच्यासाठी उघडे करण्यात आले. आता त्याने मिळालेल्या संधीचे सोने करायला हवे, असे सुनील गावसकरांना वाटते.