World Cup 2019 : पाकचा प्रतिकार मोडून ऑस्ट्रेलियाचा विजय 

Aus wins against Pak
Aus wins against Pak

वर्ल्ड कप 2019 : टॉंटन : डेव्हिड वॉर्नरच्या शतकाच्या जोरावर त्रिशतकी धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा कडवा प्रतिकार मोडून काढत 41 धावांनी विजय मिळवला आणि विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून झालेल्या पराभवानंतर विजयाची गाडी पुन्हा सुरु केली. 

पावसाळी वातावरणात झालेला हा सामना चांगलाच रंगला. वॉर्नरच्या शतकानंतर महम्मद आमीर मिळवलेल्या पाच विकेटमुळे मोठ्या धावसंखेकडे वाटचाल करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 307 धावांवरच संपला. पाकिस्तानकडून दोन फलंदाजानी भोपळा न फोडूनही चांगला प्रतिकार केला. आव्हानाचा पाठलाग केला. सामना निर्णायक टप्यावर आला असताना मिशेल स्टार्कने एकाच षटकात दोन विकेट मिळवले आणि पाकिस्तानचा खेळ खल्लास केला. 

इमाम उल हक (53) त्यानंतर महम्मद हफिझ (46) यांनी डावाच्या मध्यावर चांगले योगदान दिले, परंतु फखर झमान आणि शोएब मलिक शुन्याव बाद झाल्यामुळे पाकिस्तानची 7 बाद 200 अशी अवस्था झाली होती. सामना एकतर्फी होणार असे वाटत असताना कर्धार सर्फराझ अहमदबरोबर वाहेब रियाझने 63 चेंडूत 64 धावांची भागीदारी करून रंगत वाढवली. 

ऑस्ट्रेलियाचा पाचवा गोलंदाज मॅक्‍सवेल महागडा ठरला त्याचे एक षटक शिल्लक होते पण फिन्चने स्टार्कला आक्रमणावर लावले आणि त्याने रियाझबरोबर आमीरची विकेट तीन चेंडूत मिळवली. त्यानंतर मॅक्‍सवेलने सर्फराझला धावचीत केले आणि ऑस्ट्रेलियाचा विजय साकार झाला. 

तत्पूर्वी, सकाळी वेगवान गोलंदाजांचे हात शिवशिवणारी परिस्थिती समोर असताना पाकिस्तान गोलंदाजांनी काहीसा आखूड टप्प्यावर मारा केला; त्यामुळे त्यांना स्विंग मिळाला नाही आणि या परिस्थितीचा वॉर्नर-फिन्च यांनी फायदा उठवला. यष्टीमागून सर्फराझ "आगे डालो' असे वारंवार सांगत होता, पण आमीरचा अपवाद सोडला तर इतरांचा टप्पा भरकटला. सुरुवातीला काही चेंडूवर खेळताना वॉर्नर-फिन्च यांना अडचण आली; पण जम बसल्यावर त्यांनी प्रतिहल्ला केला. सहा आणि त्यानंतर साडेसहा धावांच्या सरासरीने फलंदाजी केली. आमीरला तीन षटकांनंतर दिलेली विश्रांती वॉर्नर-फिन्च यांच्या पथ्यावर पडली. या दोघांनी 22 षटकांत 146 धावांची सलामी दिली. तिथेच ऑस्ट्रेलिया त्रिशतकी मजल मारणार हे निश्‍चित झाले होते. पण त्याहून अधिक धावांचे त्यांचे स्वप्न आमीरने अखेरच्या षटकांत हाणून पाडले. 

वॉर्नर-फिन्च यांनी दिशा दाखवली असली तरी प्रतिकुल परिस्थितीत खेळणे सोपे नव्हते. शतक पूर्ण करताना वॉर्नरला स्लीपमध्ये जीवनदान मिळाले. शॉन मार्शच्या 23 धावांचा अपवाद वगळता इतर कोणाला जम बसवता आला नाही. अखेरच्या काही षटकांत धावांचा वेग वाढवण्याऐवजी ऑस्ट्रेलियाने एकेक फलंदाज गमावला आणि त्यांची गाडी 307 धावांवर थांबली. 

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया ः 49 षटकांत सर्वबाद 307. (ऍरॉन फिन्च 82-74 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार, डेव्हिड वॉर्नर 107-111 चेंडू, 11 चौकार, 1 षटकार, ग्लेन मॅक्‍सवेल 20 -10 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, शॉन मार्श 23 -26 चेंडू, 2 चौकार, कॅरी 20 -21 चेंडू, 2 चौकार, महम्मद आमीर 10-2-30-5, शाहिन आफ्रिदी 10-0-70-2) वि. वि. पाकिस्तान ः 45.4 षटकांत सर्वबाद 266 (इमाम उल हक 53 -75 चेंडू, 7 चौकार, बाबर आझम 30, महम्मद हाफिझ 46 -49 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, सर्फराझ अहमद 40 -48 चेंडू, 1 चौकार, हसन अली 32 -15 चेंडू, 3 चौकार, 3 षटकार, वाहेब रियाझ 45 -39 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, कमिंस 10-0-33-3, मिशेल स्टार्क 9-1-43-2, रिचर्डसन 8.4-0-62-2)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com