World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर सहज मात 

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

लंडन : भारताकडून झालेल्या पराभवाचा धक्का सहन करत सलग तिसऱ्या सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारणाऱ्या गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 87 धावांनी पराभव केला आणि विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला अधिक बळ दिले. कर्णधार ऍरॉन फिन्चनने दीडशतक मिशेल स्टार्कचे चार बळी निर्णायक ठरले. 

लंडन : भारताकडून झालेल्या पराभवाचा धक्का सहन करत सलग तिसऱ्या सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारणाऱ्या गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 87 धावांनी पराभव केला आणि विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला अधिक बळ दिले. कर्णधार ऍरॉन फिन्चनने दीडशतक मिशेल स्टार्कचे चार बळी निर्णायक ठरले. 

प्रथम फलंदाजी मिळालेल्या ऑस्ट्रेलियाने 334 धावा उभारल्या त्यानंतर श्रीलंकेने या आव्हानाचा जबरदस्त पाठलाग केला होता. 2 बाद 185 अशी मजलही मारली होती, अखेरच्या पंधरा षटकांत नाट्य रंगणार असे चित्र होते, परंतु याच वेळी स्टार्कने चार विकेटची कामगिरी केली आणि श्रीलंकेचा डोलारा 247 धावांवर कोसळला. 
शतक तीन धावांनी हुकलेल्या दिमुख करुणारत्ने आणि कुशल परेरा यांनी तोडीस तोड फलंदाजी करत 115 धावांची सलामी दिली. त्यानंतर कुशल मेंडिसने 30 धावा केल्या परंतु या तिघांचा अपवाद वगळता श्रीलंकेचे इतर फलंदाज स्टार्क आणि रिचर्डसन यांच्या वेगवान माऱ्यासमोर टिकाव धरू शकले नाहीत. 

गेल्या रविवारी भारताकडून पराभव झाला असला तरी ऑस्ट्रेलियाने 316 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध 307 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शतकी खेळी केली होती; तर आज फिन्चने 153 धावा केल्या. स्टिव्ह स्मिथनेही 73 धावांचे योगदान दिले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 300 धावा पार करणे कठीण झाले नाही. 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतकवीर वॉर्नर मात्र आज लय हरपल्याप्रमाणे खेळत होता. मुळात 26 धावांसाठी त्याने 48 चेंडू घेतले आणि त्यातील दोनच चेंडूंना तो सीमारेषेवर धाडू शकला. त्यानंतर उस्माव ख्वाजा बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने शंभरी गाठली होती. त्या वेळी ऑस्ट्रेलियाची सरासरी पाचच्या आसपास होती, परंतु स्टीव्ह स्मिथ मैदानात आला आणि वेग वाढवला. दुसऱ्या बाजूला फिन्चनेही आक्रमक पवित्रा घेतला. या दोघांनी 19 षटकांत 173 धावांची भागीदारी केली. 

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया ः 50 षटकांत 7 बाद 334 (ऍरॉन फिन्च 153 -132 चेंडू, 15 चौकार, 5 षटकार, स्टीव्ह स्मिथ 73 -59 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, ग्लेन मॅक्‍सवेल 46 -25 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, इसरू उधाना 10-0-57-2, धनंजय डिसिल्वा 8-0-40-2) वि. वि. श्रीलंका ः 45.5 षटकांत सर्वबाद 247 (दिमुथ करुणारत्ने 97 -108 चेंडू, 9 चौकार, कुशल परेरा 52 -36 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, कुशल मेंडिस 30 -37 चेंडू, 2 षटकार, मिशेल स्टार्क 10-0-55-4, कमिंस 7.5-0-38-2, केन रिचर्डस्‌न 9-1-47-3) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia wins against Sri Lanka in world cup 2019