पुण्याची अवंतिका ‘सुपरफास्ट’

पुण्याची अवंतिका ‘सुपरफास्ट’

हाँगकाँग -  प्रारंभ संथ होत असल्याने ती दबावाखाली होती. मात्र, प्रशिक्षक संजय पाटणकर यांनी तिला फक्त ‘ॲक्‍सिलरेशन’वर लक्ष्य दे, असा मोलाचा सल्ला दिला आणि भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या अवंतिका नराळेने नेमके तेच केले. त्यामुळे हाँगकाँग येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आशियाई युवा ॲथलेटिक्‍स स्पर्धेत तिला शंभर मीटरची शर्यत जिंकता आली. याबरोबरत ती आशियातील युवा गटातील वेगवान धावपटू  ठरली. 

लोणकर विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी असलेली अवंतिकाला अजून बराच पल्ला गाठायचा असला, तरी आजच्या सुवर्णपदकामुळे ती भारतीय ॲथलेटिक्‍समधील नवीन तारका म्हणून उदयास आली आहे. सकाळी ती दोनशे मीटरची प्राथमिक फेरीची शर्यत धावली. त्यात तिने २५.१९ सेकंदांची वेळ देत अंतिम फेरीत स्थान निश्‍चित केले. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या ॲथलिट्‌समध्ये सध्या ती दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे तिचे पदक निश्‍चित आहे. त्यानंतर ती शंभर मीटरच्या उपांत्य फेरीत सहभागी झाली. यात अव्वल स्थान मिळविताना तिने १२.०२ सेकंद अशी वेगवान वेळ दिली. अंतिम शर्यतीसाठी तिला पाचवी लेन मिळाली होती. तिचा प्रारंथ आठ स्पर्धकांत सर्वात संथ (रिॲक्‍शन वेळ - ०.२५४ सेकंद) होता. अर्ध्या टप्प्यापर्यंत जपानची हॅने ओयामा आघाडीवर होती. त्यानंतर अवंतिकाने गिअर बदलला आणि ११.९७ सेकंद या आतापर्यंतच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

पुण्यात आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये सराव करणाऱ्या उसेद खानने डेकॅथलॉनमध्ये ६९५२ गुणांसह सुवर्णपदक जिंकताना स्पर्धा विक्रमाची नोंद केली.

गेल्या काही महिन्यांतील तिची कामगिरी पाहता आणि पहिल्या दोन स्पर्धांतील पदक विजेत्यांची कामगिरी विचारात घेता पदक अपेक्षित होते. मात्र, सुवर्णपदकाने आनंद द्विगुणित झाला. विशेष म्हणजे तिने प्रथम बारा सेकंदांच्या आत धावण्याची कामगिरी केली. माझ्या प्रशिक्षणाखाली तयार झालेल्या खेळाडूंनी जिंकलेले हे आठवे सुवर्णपदक होते. 
- संजय पाटणकर, अवंतिकाचे प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com