रवींद्र जडेजाऐवजी अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

दुसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाने गोलंदाजी करताना निराशेने चेंडू फलंदाज पुष्पकुमाराच्या दिशेने फेकला होता. त्याच्या याच कृतीवर पंच ऑक्‍सेनफोर्ड आणि रॉड टकर यांनी आक्षेप घेतला

कोलंबो - श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघामध्ये अष्टपैलु रवींद्र जडेजा याच्याऐवजी डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल याचा समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना आता 12 ऑगस्टपासून कॅंडी येथे खेळविण्यात येणार आहे.

23 वर्षीय पटेल याने अद्यापी कसोटी प्रकारांत पदार्पण केलेले नाही. पटेल याने आत्तापर्यंत 30 एकदिवसीय व 7 ट्‌वेंटी-ट्‌वेंटी सामन्यांमधून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेमध्ये भारताने याआधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यातही निर्विवाद वर्चस्व राखून निर्भेळ यश मिळविण्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील संघ प्रयत्नशील आहे.

क्रिकेटच्या चालू मोसमात जडेजावर इंदूर येथील कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना खेळपट्टीवर पळून ती खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याला तीन नकारात्मक गुणही देण्यात आले होते. दुसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाने गोलंदाजी करताना निराशेने चेंडू फलंदाज पुष्पकुमाराच्या दिशेने फेकला होता. त्याच्या याच कृतीवर पंच ऑक्‍सेनफोर्ड आणि रॉड टकर यांनी आक्षेप घेतला.

याच कसोटीत सामन्याचा मानकरी ठरणाऱ्या जडेजाला लगेच सामना अधिकाऱ्यांनी बोलावून घेतले. या चौकशीदरम्यान जडेजाने आपली चूक मान्य केली. त्यानंतर सामना अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या नियम २.२८ नुसार आणखी तीन नकारात्मक गुण दिले. एका मोसमात खेळाडूस चारपेक्षा अधिक जास्त नकारात्मक गुण मिळाल्यास त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते.

Web Title: Axar Patel replaces Ravindra Jadeja