ड्रग्जच्या विळख्यात, फुटबॉलच्या मातीत घडतोय बॅडमिंटन स्टार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नान्जिंग (चीन) : 'बॅडमिंटनची ओळख झाली नसती, तर मी या जगातच नसतो' हे वाक्‍य आहे ब्राझीलचा बॅडमिंटनपटू यगॉर कोएल्हो याचे. ड्रग्जचा विळखा आणि फुटबॉलच्या वेडात अडकलेल्या ब्राझीलमधील रियो फावेला या शहरातून यगॉर कोएल्हो हा बॅडमिंटनपटू आज जगाला आपली ओळख देतोयं. 

नान्जिंग (चीन) : 'बॅडमिंटनची ओळख झाली नसती, तर मी या जगातच नसतो' हे वाक्‍य आहे ब्राझीलचा बॅडमिंटनपटू यगॉर कोएल्हो याचे. ड्रग्जचा विळखा आणि फुटबॉलच्या वेडात अडकलेल्या ब्राझीलमधील रियो फावेला या शहरातून यगॉर कोएल्हो हा बॅडमिंटनपटू आज जगाला आपली ओळख देतोयं. 

शहरातील जवळचे मित्र एकतर ड्रग्जच्या विळख्यात अडकले, काही फुटबॉलकडे झुकले; पण आपल्याला बॅडमिंटनची ओळख झाली नसती, तर आपणही कदाचित असेच कुठे तरी खितपत पडलो असतो, अशी यगॉरची भावना आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी तो तैवानच्या चोऊ तिएन चेन याच्याकडून उप-उपांत्यपूर्व फेरीत हरला. पण, त्यापूर्वी तिसऱ्या फेरीत भारताच्या 11व्या मानांकित एच. एस. प्रणॉयला हरवून 21 वर्षीय कोएल्होने आपली ओळख जगाला करून दिली. दक्षिण अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून तो उदयास येत आहे. नुसताच उदयास नाही, तर वाईट वळणावर लागणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील युवा पिढीसाठी तो आदर्श ठरत आहे. 

ब्राझीलचा असूनही तो उत्तम इंग्लिश बोलतो आणि बॅडमिंटननेच आपल्याला घडवले, असे तो अभिमानाने सांगतो. तो म्हणाला, "बॅडमिंटन नसते, तर मी कुठे असतो? हा प्रश्‍न माझ्यासाठी खूप कठीण आहे. कारण बॅडमिंटनने माझे आयुष्यच बदलले आहे. बॅडमिंटनला जवळ केले आणि अवघे जग जवळ झाले. जगभर फिरलो, अनेक मित्र झाले, एक वेगळाच अनुभव मला बॅडमिंटनने दिला.'' आपल्या बॅडमिंटनच्या आवडीविषयी कोएल्हो म्हणाला, "वडील, बॅडमिंटन प्रशिक्षक आणि सेबॅस्टिओ डायस डी ऑलिव्हिएरा या तिघांमुळे आपण बॅडमिंटनमध्ये आलो. फावेला शहरातील मुलांनी वाईट मार्गाकडे वळू नये, यासाठी माझ्या वडिलांनी बॅडमिंटनविषयी एक कार्यक्रम राबविला. यासाठी प्रथम माझी निवड केली. इथूनच माझे बॅडमिंटनशी नाते जोडले गेले.'' हा कार्यक्रम करताना अनेक मुले सुरवात करून पळून गेली. ड्रग्जचा विळखा ते तोडू शकले नाहीत. आता माझ्या प्रगतीने येणाऱ्या पिढीला माझ्यासारखे घडण्याची प्रेरणा मिळत आहे, यातच मला समाधान आहे, असेही त्याने सांगितले. 

चांगला बॅडमिंटनपटू घडण्यासाठी आधी उत्तम डान्सर असायला हवे, असे वडिलांनी सुचविले. त्यामुळे बॅडमिंटन बरोबर डान्सही शिकायला लागलो. त्यामुळे पदलालित्य सुधारले. उत्तम बॅडमिंटनपटू झालो. या खेळाने मला एक चांगला माणूस म्हणून घडवले. 
-यगॉर कोएल्हो 

Web Title: Badminton stars in football soil